शेअर बाजारामध्ये वाढ कायम असून सेन्सेक्स व निफ्टी हे सार्वकालिक उच्चांकावर बंद झाले आहेत. आता मान्सूनचे आगमन कसे होणार, यावर बाजारातील घटकांची नजर राहणार असून त्यावर बाजाराची वाटचाल राहणार आहे.
भारताची विकासाच्या मार्गावर सुरू असलेली दमदार वाटचाल ही बाजाराला अधिक बळ देणारी आहे. त्यामुळे देशाअंतर्गत व परकीय वित्तसंस्थांकडून सातत्यपूर्ण खरेदी होत आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराच्या सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी नवीन उच्चांकाची नोंद केली आहे. सेन्सेक्स ६३,३८४.५८ या विक्रमी पातळीवर बंद झाला.
सुमारे सहा महिन्यांनंतर त्याने ही उडी घेतली आहे. शुक्रवारी निफ्टी १८,८२६ अंशांवर बंद झाला. याआधीचा १८,८१२.५० अंशांचा उच्चांक त्याने ओलांडला आहे. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स ७५८ अंकांनी वधारला. सेन्सेक्सच्या आघाडीच्या १० पैकी ६ कंपन्यांचे बाजार भांडवल १.१३ लाख काेटी रुपयांनी वाढले.
या सप्ताहामध्ये कोणतीही महत्त्वाची आकडेवारी येणारी नाही; त्यामुळे पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा आणि मान्सूनची भारतातील प्रगती या दोन बाबींवरच बाजाराची वाटचाल अवलंबून आहे. परकीय वित्तसंस्था तसेच देशांतर्गत वित्तीय संस्थांकडून नफा कमावण्यासाठी विक्री झाल्यास त्याचा बाजारावर विपरीत परिणाम होणे शक्य आहे.
परकीय वित्तसंस्थांनी गुंतविले १६ हजार कोटी
चालू महिन्यामध्ये परकीय वित्तसंस्थांचा भारतीय शेअर बाजाराकडे ओढा असल्याचे दिसून आले आहे. गतसप्ताहात त्यांनी ६६४४ कोटी रुपये गुंतविले आहेत. या महिन्याच्या पहिल्या १६ दिवसांमध्ये या संस्थांनी १६,४०५ कोटी रुपये गुंतविले आहेत. याआधीचे तीन महिनेही परकीय संस्थांनी गुंतवणूक केली आहे. देशांतर्गत वित्तसंस्थांनीही या महिन्यात ४३२९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.