Reliance Enter Into Car Market: भारतीय बाजारात अनेक स्वदेशी-विदेशी कार निर्माता कंपन्या आहेत. काही परदेशी कंपन्या, परदेशातच तयार झालेल्या कार भारतात आणून विकतात, तर काहींनी भारतातच मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारले आहेत. याशिवाय, भारतीय कार निर्माता कंपन्यांसंदर्भात बोलायचे झाल्यास, टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्राचे नाव सर्वात पहिले समोर येते. यातच यादीत आता रिलायन्सच्या (Reliance) नावाचाही समावेश होऊ शकतो.
रिलायन्सच्या कारची बाजारात एन्ट्री! -भारतातील मोठे उद्योगपती अनिल अंबानी यांची रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चर कंपनी आता देशात इलेक्ट्रिक कार आणि त्या कारसाठी लागणारी बॅटरी तयार करण्याची योजना आखत असल्याचे वृत्त आहे. रॉयटर्सने दिलेल्या एका वृत्तानुसार, यासाठी रिलायन्सने चीनची कार निर्माता कंपनी BYD च्या माजी भारतीय कार्यकारी अधिकाऱ्याला कंपनीत घेतले आहे. याशिवाय, ईव्ही प्लांटसाठी लागणाऱ्या खर्चाच्या निर्धारणासाठी एक्सटर्नल कंसल्टंट्सचाही कंपनीत समावेश केला आहे.
संबंधित वृत्तानुसार, कंपनीचा उद्देश सुरुवातीला एक असा प्लांट तयार करणे आहे, ज्यात एका वर्षात सुमारे 2,50,000 वाहने तयार होऊ शकतील. याच बरोबर, हा आकडा आगामी काळात 7,50,000 पर्यंत वाढविण्याचेही कंपनीचे लक्ष आहे. वाहनांच्या उत्पादनाबरोबर रिलायन्स, एक 10 गिगावॅट-तास (GWh) एवढ्या क्षमतेचा बॅटरी प्लांट उभारण्याचाही विचार करत आहे.
...तर अंबानी बंधी इलेक्ट्रिक वाहनांच्या शर्यतीत समोरा-समोर दिसू शकतात - आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि त्यांचे छोटे भाऊ अनिल अंबानी यांनी 2005 मध्ये आपले उद्योग वाटून घेतले होते. महत्वाचे म्हणजे, मुकेश अंबानी यांची कंपनीही बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगवर काम करत आहे. याच वेळी आता अनिल अंबानी यांनीही कार बरोबरच बॅटरिचे उतत्पादन सुरू केले, तर हे दोघे भाऊ इलेक्ट्रिक वाहनांच्या शर्यतीत समोरा-समोर दिसू शकतात.