देशातील कोट्यवधी ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) यापूर्वी रेल्वेतून प्रवास करताना सवलत मिळत होती. कोरोना काळात ही सवलत मागे घेण्यात आली होती. ही सूट अद्याप परत सुरू करण्यात आलेली नाही. रेल्वे भाड्यातील सबसिडी पूर्ववत करण्याबाबत लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला. मात्र, यावर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट उत्तर दिलं नाही. "भारतीय रेल्वे प्रत्येक रेल्वे प्रवाशाला रेल्वे भाड्यात ४६ टक्के सवलत देत आहे," असं ते म्हणाले.
कोरोनापूर्वी मिळत होती सूट
मार्च २०२० मध्ये कोविड-१९ लॉकडाऊनपूर्वी भारतीय रेल्वे ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात ५० टक्के सवलत देत होती. कोविड लॉकडाऊनदरम्यान, रेल्वे सेवा पूर्णपणे बंद होती. परंतु जून २०२२ मध्ये रेल्वे सेवा पूर्ववत झाली. परंतु जेव्हा रेल्वे सुरू झाली तेव्हा ज्येष्ठ नागरिकांची सूट पूर्ववत करण्यात आली नाही. तेव्हापासून संसदेच्या दोन्ही सभागृहांसह विविध व्यासपीठांवर हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
काय म्हणाले रेल्वेमंत्री?
खासदार दीपक देव यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं की, वर्ष २०२२-२३ मध्ये रेल्वेने प्रवासी तिकिटांवर एकूण ५६ हजार ९९३ कोटी रुपयांचं अनुदान दिलं आहे. प्रत्येक प्रवाशानं केलेल्या प्रवासावर रेल्वे सरासरी ४६ टक्के अनुदान देतं. ही सबसिडी सर्व प्रवाशांसाठी आहे. याशिवाय दिव्यांगांसाठी चार श्रेणी, रुग्णांसाठी ११ आणि विद्यार्थ्यांसाठी आठ श्रेणींमध्ये सूट देण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिकांकडून किती कमाई?
मध्य प्रदेशचे रहिवासी चंद्रशेखर गौर यांनी माहितीच्या अधिकारात केलेल्या अर्जाला उत्तर देताना भारतीय रेल्वेनं २०२२-२३ या आर्थिक वर्षात सुमारे १५ कोटी ज्येष्ठ नागरिकांकडून सुमारे २,२४२ कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवलं होतं. गेल्या वर्षी वैष्णव यांनी नोव्हेंबरमध्ये लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वेनं २०१९-२० मध्ये प्रवासी तिकिटांवर ५९,८३७ कोटी रुपयांचं अनुदान दिलं होतं आणि ही सवलत अजूनही कायम आहे.