नवी दिल्ली : सर्वांसाठी पेन्शन योजना या वर्षाच्या अखेरीस लागू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालय पेन्शनशी संबंधित प्रक्रियेवर काम करत आहे. येत्या काही महिन्यांत या प्रक्रियेला अंतिम स्वरूप दिले जाईल.
या योजनेत योगदानकर्ता अधिक योगदान देऊ शकेल. यामध्ये असंघटित क्षेत्रातील लोकांचाही समावेश करण्यात येणार आहे.
किमान योगदानाव्यतिरिक्त बचतीची अतिरिक्त रक्कमही पेन्शन खात्यात जमा करता येणार आहे. त्यानुसार निवृत्तीनंतर पेन्शन दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोणकोणते पर्याय?
जर एखादा कामगार त्याच्या पेन्शन खात्यात दरमहा ३,००० रुपये योगदान देत असेल आणि त्यादरम्यान त्याच्याकडे ३०,००० रुपये किंवा ५०,००० रुपये असतील तर तो ती रक्कमदेखील जमा करू शकतो. पेन्शन सुरू करण्याशी संबंधित कालावधी निवडण्याचा पर्यायदेखील असेल.
कोणतीही सक्ती नाही
प्रत्येक व्यक्तीला पेन्शन योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी रोजगाराची गरज भासणार नाही. म्हणजेच, जर कोणी स्वतःचे दुकान चालवत असेल आणि भविष्यासाठी पेन्शन म्हणून काही बचत करू इच्छित असेल तर तोदेखील या योजनेत सहभागी होऊ शकेल.
योजनेत सहभागी होण्यासाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे असेल, परंतु त्यानंतरही कोणतीही व्यक्ती यामध्ये योगदान देऊ शकते. कामगार मंत्रालय असंघटित क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञ आणि लोकांकडून मते घेत आहे. वर्ष २०३६ पर्यंत देशातील एकूण वृद्धांची संख्या २२ कोटींहून अधिक असेल असा अंदाज आहे.