लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : भारताकडून काही तांदळांच्या जातींवर निर्यातबंदी लादल्यानंतर आता साखरेच्या निर्यातीवरही बंदी घातली जाण्याची भीती व्यावसायिकांत व्यक्त करण्यात येत आहे. सध्या जगात साखरेची टंचाई आहे. त्यामुळे जग भारताच्या साखरेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. यंदा भारतात असंतुलित पावसामुळे सलग दुसऱ्या वर्षी साखरेचे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत आहे. तसे झाल्यास निर्यातीसाठी साखरेची उपलब्धता घटेल. त्यामुळे सरकारकडून साखर निर्यातीवर प्रतिबंध घातला जाऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.
महागाई रोखण्यासाठी सरकारने गहू आणि तांदळाच्या काही जातींच्या निर्यातीवर आधीच बंधने लादली आहेत. भारताच्या या निर्णयाचा जगातील अन्नधान्य बाजारावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. वाईट हवामान आणि युक्रेन युद्ध यामुळे जागतिक धान्य बाजार आधीच तणावाखाली आहे.
उत्पादन ३.४ टक्क्यांनी घटणार इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य झुनझुनवाला म्हणाले की, देशातील प्रमुख ऊस उत्पादक असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकात यंदा जूनमध्ये पुरेसा पाऊस पडलेला नाही.
२०२३-२४ मध्ये साखरेचे उत्पादन ३.४ टक्के घटून ३१.७ दशलक्ष टनांवर घसरण्याची शक्यता आहे. त्यातच यंदा इथेनॉल निर्मितीसाठी ४.५ दशलक्ष टन साखर वापरली जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ९.८ टक्के अधिक आहे. स्टोनएक्सच्या साखर व इथेनॉल विभागाचे प्रमुख ब्रुनो लिमा यांनी सांगितले की, उत्पादनाची ही पातळी लक्षात घेता भारताकडून साखरेची निर्यात केली जाण्याची शक्यता दिसून येत नाही.
टंचाई निर्माण होण्याची भीतीट्रॉपिकल रिसर्च सर्व्हिसेसच्या साखर व इथेनॉल विभागाचे प्रमुख हेन्री ॲकेमाईन यांनी सांगितले की, भारतातील सरकार महागाईबाबत चिंतेत आहे. अन्नसुरक्षेबाबत चिंता असल्यानेच भारताकडून तांदूळ निर्यातबंदी घातल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे देशात साखरेची टंचाई भासू नये यासाठी सरकार आता साखर निर्यातबंदीचा निर्णय घेऊ शकते.
भारताने केलेली तांदळाची निर्यातबंदी थायलंडच्या पथ्यावरnभारताची तांदूळ निर्यातबंदी थायलंडच्या पथ्यावर पडली आहे. थायलंडचे मंत्री ज्यूरिन लक्सानाविसिट यांनी सोमवारी माहिती दिली की, थायलंडने आतापर्यंत ४.८ दशलक्ष मेट्रिक टन इतका तांदूळ निर्यात केला. nसध्या तांदूळ निर्यात दर महिन्याला ७ ते ८ लाख मेट्रिक टनांनी वाढला आहे. थायलंड हा भारतानंतरचा जगातील दुसरा सर्वांत मोठा तांदूळ निर्यातदार देश आहे. nयंदा थायलंडमधून ८ दशलक्ष मेट्रिक टनांहून तांदळाची निर्यात होईल, असा अंदाज थाई राईस एक्सोटर्स असोसिएशनने व्यक्त केला आहे.