नवी दिल्ली : केंद्र सरकारने चालू वर्षासाठी (२०१९-२०) १.०५ लाख कोटींचे लक्ष्य ठेवले असले तरी भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) एअर इंडिया व कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (कॉनकॉर) या तीन बलाढ्य कंपन्यांची निर्गुंतवणूक मार्चपूर्वी होणे अशक्य आहे. त्यामुळे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ६५००० कोटींनी हुकण्याची शक्यता आहे.सरकारच्या अपेक्षेनुसार भारत पेट्रोलियमच्या विक्रीतून ५६,३५९ कोटी, एअर इंडियामधून १८,००० कोटी तर कंटेनर कॉर्पोरेशनमधून १०,७३४ कोटी असे ७५,००० कोटी मिळण्याची आशा आहे. पण या कंपन्या घेण्यासाठी उत्सुक असलेले गुंतवणूकदार दिरंगाई करत आहेत. त्यामुळे निंर्गुतवणूक प्रक्रिया मार्चपूर्वी होणे अशक्य आहे,अशी माहिती निर्गुतवणूक मंत्रालयातील सुत्रांनी दिली. काल अमेरिकेने ईराकवर हल्का केल्याने महायुद्धाच्या भीतीने जगभरचे शेअर बाजार निर्देशांक घसरले आहेत. त्यात या कंपन्यांच्या शेअरच्या किंमती कमी झाल्या आहेत, ही घसरण काही दिवस सुरू राहीली तर या कंपन्यांमधून ६५,००० कोटीच मिळतील अशीही शक्यता सूत्रांनी बोलून दाखवली. निर्गुंतवणुकीत कमी रक्कम मिळावी तर अर्थसंकल्पीय तूट २.४० लाख कोटीवर जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.
निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ६५,००० कोटींनी हुकणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2020 6:15 AM