Join us

ITR Income Tax Return: ३१ जुलै नंतर इन्कम टॅक्स रिटर्नची तारीख पुढे जाणार का? Income Tax विभागानं दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 12:32 PM

ITR Income Tax Return: जर तुम्ही तुमचा आयटीआर अद्याप भरला नसेल तर तो लवकरात लवकर भरून टाका. यंदा आयकर विभागाकडून आयटीआरची शेवटची तारीख वाढवली जाणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

ITR Income Tax Return: जर तुम्ही तुमचा आयटीआर अद्याप भरला नसेल तर तो लवकरात लवकर भरून टाका. यंदा आयकर विभागाकडून आयटीआरची शेवटची तारीख वाढवली जाणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर इन्कम टॅक्स विभागानं स्पष्टीकरण दिलं आहे. आयटीआर भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे. इन्कम टॅक्स विभाग यावेळी ही तारीख वाढवण्याची शक्यता कमी आहे.

यावेळीही अनेक करदात्यांना ई-फायलिंगबाबत अडचणींचा सामना करावा लागला. परंतु सर्व तांत्रिक अडचणींनंतरही आयटीआर फायलिंगची तारीख वाढवण्याची शक्यता कमी आहे.

आयटीआर भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ

इन्कम टॅक्स विभागाच्या रिपोर्टनुसार २२ जुलैपर्यंत ४ कोटी लोकांनी आयटीआर दाखल केले होते. गेल्या वर्षी या तारखेपर्यंत कमी लोकांनी आयटीआर भरला होता. गेल्या वर्षी हा आकडा गाठण्यासाठी २४ जुलैपर्यंतचा कालावधी लागला होता.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक लोक आयटीआर भरतील, अशी अपेक्षा आयकर विभागानं व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी जुलै अखेरपर्यंत ६.७७ कोटी लोकांनी आयटीआर भरले होते.

समस्यांबाबत विभागाचं मत काय?

करदाते आणि चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशननं ई-फायलिंग पोर्टलमध्ये त्रुटी असल्याची तक्रार केली होती. त्यावर विभागाने ती दुरुस्त करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलंय. या प्रकरणी सीबीडीटी इन्फोसिस, आयबीएम आणि हिताची यांच्या सतत संपर्कात आहे. "आम्ही सेवा प्रदात्याशी सतत संवाद साधत आहेत. समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जेणेकरून प्रक्रिया पूर्णपणे उत्तम करता येईल," अशी प्रतिक्रिया सीबीडीटीच्या अध्यक्षांनी दिली.

३१ जुलैपर्यंत आयटीआर जमा न करणाऱ्यांना दंडासह, ३१ डिसेंबरपर्यंत दंड जमा करण्याची मुदत देण्यात आली आहे. आयटीआर भरण्यासाठी विभागाकडून सातत्यानं लोकांना प्रोत्साहन दिलं जात आहे.

टॅग्स :इन्कम टॅक्ससरकार