प्रसाद जोशी
गतसप्ताहामध्ये बाजारात मोठी घसरण झाल्यानंतर आगामी सप्ताहात सर्वांच्याच नजरा अमेरिकेकडे लागलेल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापारनीतीमुळे जागतिक व्यापार युद्ध सुरू होण्याची भीती असून या सप्ताहातच फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या बैठकीचा तपशील जाहीर होणार असल्यामुळे त्याचा बाजारावर परिणाम जाणवण्याची मोठी शक्यता आहे.
अपेक्षेहून कमी प्रमाणात आलेले कंपन्यांचे तिमाही निकाल आणि परकीय वित्तसंस्थांची विक्री यामुळे मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली आहे. गतसप्ताहामध्ये मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक २६४४.६० अंशांनी खाली आला तर निफ्टीमध्ये ८१० अंशांची घसरण झाली. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये काहीशी भीती निर्माण झाली आहे. सुमारे आठ दिवसांच्या घसरणीनंतर बाजार वाढण्याची अपेक्षा आहे. कंपन्यांचे तिमाही निकाल आता संपले आहेत. जागतिक घडामोडींवरच बाजाराची वाटचाल होणार आहे.
विदेशी वित्तसंस्थांकडून २१ हजार कोटींची विक्री
परकीय वित्तसंस्थांनी भारतीय शेअर बाजारातून फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांमधून २१ हजार २७२ कोटी रुपयांचे समभागविकले आहेत.
गेल्या अडीच महिन्यांपासून परकीय वित्तसंस्था सातत्याने भारतीय शेअर बाजारातून रक्कम काढून घेत आहेत. त्यामुळे बाजाराला उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे.
जानेवारी महिन्यामध्ये परकीय वित्तसंस्थांनी ७८ हजार २७ कोटी रुपयांचे समभाग विकले आहेत. त्यामुळे सन २०२५ या वर्षामध्ये परकीय वित्तसंस्थांनी भारतामधून १ लाख कोटींची रक्कम काढून घेतली आहे.