प्रसाद गो. जोशी
सात आठवडे सातत्याने वाढत असलेल्या बाजारावर नफा कमविण्यासाठीच्या विक्रीचे दडपण आले आणि बाजार काही प्रमाणात खाली येऊन बंद झाला. याला अपवाद ठरला तो स्मॉलकॅप निर्देशांकाचा. आगामी सप्ताहात ख्रिसमसच्या सुट्या आणि डेरिव्हेटीव्हजची मासिक सौदापूर्ती असल्याने बाजारात घसरण होण्याची शक्यता आहे. गत सप्ताहामध्ये स्मॉलकॅप निर्देशांक ४२,६४८.८६ अशा नवीन उच्चांकावर पोहोचला. मात्र, त्यानंतर तो काहीसा खाली येत ४२,००१.७५ अंशांवर बंद झाला. मात्र, बाजाराचे अन्य महत्त्वाचे निर्देशांक खाली आले आहेत. सेन्सेक्समध्ये ३७६.७९ अंशांची घसरण होऊन तो ७१,१०६.९१ अंशांवर बंद झाला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १०७.२५ अंशांनी खाली येऊन २१,३४९.४० अंशांवर बंद झाला. बीएसई मिडकॅप या क्षेत्रीय निर्देशांकामध्ये ३१५.६७ अंशांची घट झाली आहे. हा निर्देशांक ३५,८८२.६८ अंशांवर बंद झाला आहे. बाजार वाढत असताना नफा कमविण्यासाठी विक्रीही केली जात असते. अशाच विक्रीचा फटका बसून बाजाराच्या वाढीला ब्रेक लागल्याचे दिसत आहे. गत सप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्थाही विक्रीच्या मूडमध्ये असल्याने बाजार घटला.
परकीय वित्त संस्थांकडून विक्री
परकीय वित्त संस्थांनी गत सप्ताहात नफा कमविण्यासाठी विक्रीचा पवित्रा घेतला. संस्थांनी ६४२२.२४ कोटींची विक्री केली, तर देशांतर्गत वित्तसंस्थांनी बाजारात ९०९३.९९ कोटी ओतले. डिसेंबरमध्ये परकीय वित्त संस्थांनी बाजारात २३,३१०.८२ कोटी रुपयांची खरेदी केली आहे.
गुंतवणूकदारांना १ लाख कोटींचा फटका
बाजारात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत १ लाख कोटींची घट झाली आहे. बाजारातील एकूण भांडवलाचे मूल्य ३६३ लाख कोटी रुपये होते ते कमी होऊन ३६२ लाख कोटी झाले आहे.