Join us  

बाजारात घसरगुंडी सुरूच राहणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 7:32 AM

रिझर्व्ह बँकेच्या पत धोरणात व्याजदराबाबत काय निर्णय होणार याकडे आगामी सप्ताहामध्ये बाजाराचे लक्ष असेल.

प्रसाद गो. जोशी

परकीय वित्त संस्थांनी गत महिन्यात मोठी विक्री केल्याने आगामी काळात त्यांचे धोरण काय असेल, तसेच रिझर्व्ह बँकेच्या पत धोरणात व्याजदराबाबत काय निर्णय होणार याकडे आगामी सप्ताहामध्ये बाजाराचे लक्ष असेल.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी यांमध्ये गत सप्ताहात घट झाली. मात्र, मिडकॅप, स्मॉलकॅप या निर्देशांकांमध्ये वाढ झाली. परकीय वित्त संस्थांकडून सातत्याने सुरू असलेली विक्री आणि अमेरिकेमध्ये वाढलेले व्याजदर यामुळे बाजारात घट झाली. सेन्सेक्स १८०.७४ अंशांनी खाली येऊन ६५,८२८.४१ अंशांवर बंद झाला. निफ्टी १९,६३८.३० अंशांवर बंद झाला आहे. मागील सप्ताहापेक्षा त्यामध्ये ३५.९५ अंशांची घट झाली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये गत सप्ताहामध्ये वाढ झाली. या निर्देशांकांमध्ये अनुक्रमे ३९१.९५  व ५०४.७५ अंशांनी वाढ झाली आहे.

येत्या सप्ताहामध्ये रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर होईल. त्यात व्याजदराचा निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे परकीय वित्तसंस्था निधी काढून घेणे सुरू ठेवण्याची शक्यता आहे. परिणामी बाजार आणखी खाली जाण्याची शक्यता आहे.

परकीय वित्त संस्थांनी काढले १४,७६७ कोटी

सप्टेंबरमध्ये परकीय वित्त संस्थांनी बाजारातून गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावला. संस्थांनी १४,७६७ कोटी भारतातून काढून घेतले. अमेरिकेमध्ये बॉण्डसवर मिळणारे व्याजदर वाढल्याने तेथे गुंतवणूक वित्त संस्थांना लाभदायक वाटते. त्यामुळे त्यांनी आशियाई बाजारातून पैसा काढून घेण्याचे धोरण स्वीकारले.

घसरणीतही श्रीमंत झाले गुंतवणूकदार

गत सप्ताहामध्ये सेन्सेक्स, निफ्टीत घट होऊनही शेअर बाजारातील गुंतवणूकदार १,२९,३१६.९७ कोटी रुपयांनी श्रीमंत झाले आहेत. सप्ताहाअखेर बाजाराचे एकूण भांडवल मूल्य ३,१९,०६,८७१.९७ कोटींवर पोहोचले आहे. आधीच्या सप्ताहात ते ३,१७,७७,५५४.९७ कोटी होते.

टॅग्स :शेअर बाजार