Join us  

सहारामध्ये अडकलेले पैसे परत मिळणार का? सुब्रतो रॉय यांच्या निधनानंतर अनेकांच्या मनात प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 2:07 PM

सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचं मंगळवारी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर सहाराच्या कोट्यवधी गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

सहारा समूहाचे (Sahara India Pariwar) प्रमुख सुब्रत रॉय यांचं मंगळवारी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर सहाराच्या कोट्यवधी गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. आता त्यांचे पैसे बुडणार का?, असं नसेल तर सहारातील पैसे कसे काढता येणार? असे प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकांना पैसे मिळण्याची अपेक्षा होती. अनेकांनी सहारा रिफंड पोर्टलवर पैसे परत करण्यासाठी अर्जही केले होते. मात्र आता गुंतवणूकदारांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मग आता जाणून घेऊया गुंतवणूकदारांच्या रिफंडचे काय होणार?जितेंद्र कुमार नावाच्या एका गुंतवणूकदारानं चिंता व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशात राहणारे जितेंद्र यांचे साडेतीन लाख रुपये अडकलेले आहेत. अनेक वर्षांपासून ते पैसे परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर आपल्याला पैसे मिळतील अशी अपेक्षा होती, परंतु सुब्रतो रॉय यांच्या निधनानंतर आता काय होईल याची माहिती नाही, असं ते म्हणाले. आणखी एका संजय गुप्ता नावाच्या गुंतवणूकरानंही भीती व्यक्त केली. आपण १० वर्षांपूर्वी सहारामध्ये १ लाख ७५ हजारांची गुंतवणूक केली होती. सुब्रतो रॉय यांच्या निधनाचं दु:ख आहे. परंतु आपले पैसे अडकल्याचीही चिंता आहे, असं ते म्हणाले. सरकारनं आपले पैसे परत मिळवून द्यावे असं गुंतवणूकदारांचं म्हणणं आहे.रिफंड पोर्टलची सुरुवातकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सहारा रिफंड पोर्टल लाँच केलं होतं. या पोर्टलद्वारे सहारामध्ये अडकलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत. या रिफंड पोर्टलद्वारे, ज्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक मॅच्युअर झाली आहे त्यांना रक्कम परत केली जाईल. या पोर्टलवर गुंतवणूकदार आपली नावं नोंदवतील. पडताळणीनंतर त्यांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार होती.कशी आहे प्रक्रिया?ऑनलाइन दावा दाखल केल्यानंतर १५ दिवसांच्या आत गुंतवणूकदारांना एसएमएसद्वारे कळवलं जाईल. यानंतर गुंतवणुकीची रक्कम बँक खात्यात येईल. म्हणजेच या प्रक्रियेला किमान ४५ दिवस लागतील. रिफंड पोर्टल सुरू झाल्यामुळे सहारामध्ये गुंतवणूक केलेल्या १० कोटी गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. ज्या गुंतवणूकदारांनी सहारामध्ये पैसे गुंतवले आहेत, त्यांनी सर्वप्रथम त्यांचे पैसे कोणत्या सहकारी संस्थेत गुंतवले आहेत हे तपासावं लागेल. त्यानंतर त्याच्याशी संबंधित सर्व कागदपत्रं गोळा करावी लागतील.कशी आहे प्रक्रिया?नोंदणीसाठी, अर्जदारांना आधार कार्डचे अखेरचे ४ क्रमांक एन्टर करावे लागतील. यानंतर आधारशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आलेला OTP टाकावा लागेल. या प्रक्रियेनंतर, 'अटी आणि शर्ती' यावर टीक करावी लागेल.ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर १२ अंकी आधार क्रमांक आणि OTP पुन्हा टाकावा लागेल. तुम्ही ओटीपी टाकताच तुमचा संपूर्ण तपशील आधार कार्डद्वारे पडताळला जाईल. यानंतर पुढील प्रक्रियेत वडिलांचे/पतीचे नाव आणि ईमेल आयडी टाकावा लागेल. यानंतर सोसायटीशी संबंधित एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडेल. ज्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती द्यायची आहे. त्यानंतर नेक्स्ट/सबमिट बटणावर क्लिक करा.यानंतर पीडीएफ फॉर्म डाउनलोड होईल. पीडीएफ फॉर्मची प्रिन्टआऊट घेतल्यानंतर त्यावर तुमचा फोटो चिकटवा आणि सही करा. प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात, तुम्हाला तोच फॉर्म 'CRCS सहारा रिफंड पोर्टल' वर अपलोड करावा लागेल. यासोबतच तुम्हाला पॅन कार्डची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल. यानंतर, नेक्स्ट/सबमिट बटणावर क्लिक करा. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, भविष्यातील संदर्भासाठी नोंदणी क्रमांक तुमच्याकडे ठेवा. यासाठी तुम्हाला https://mocrefund.crcs.gov.in/Depositor/Register या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.

टॅग्स :व्यवसायपैसा