Join us  

आरबीआयचे उदार धोरण आता ‘तटस्थ’ होणार? द्वैमासिक पतधोरणाची आज घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 12:17 PM

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय पतधोरण समितीची बैठक मंगळवारी सुरू झाली आहे. नुकताच जाहीर झालेला अर्थसंकल्प, चलनवाढ होण्याची भीती आणि तणावपूर्ण भू-राजकीय परिस्थिती या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे.

मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक मंगळवारपासून सुरू  असून निर्णयांची घोषणा गुरुवारी (दि.१०) केली जाणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक प्रमुख दर कायम राखण्याची शक्यता असून बाजारामध्ये पुरेसे चलन उपलब्ध राहावे, यासाठी रिव्हर्स रेपो दरामध्ये काही बदल केले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय पतधोरण समितीची बैठक मंगळवारी सुरू झाली आहे. नुकताच जाहीर झालेला अर्थसंकल्प, चलनवाढ होण्याची भीती आणि तणावपूर्ण भू-राजकीय परिस्थिती या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. गेल्या सुमारे दोन वर्षांपासून बँकेने कायम राखलेले उदार धोरण आता काहीसे ‘तटस्थ’ होण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी वर्तविली आहे. असे असले तरी बँकेकडून रेपो दरामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही, असे सर्वसाधारण मत दिसत आहे. 

भारतीय अर्थव्यवस्थेने कोविड संकटाचा चांगला सामना केला. तथापि, देशात ओमायक्रॉनचे सावट असून अर्थव्यवस्थेला त्यालाही तोंड द्यावे लागेल. खनिज तेल,कमोडिटीच्या वाढत्या किमतींमुळे चलनवाढीची अपेक्षा आहे. तिसऱ्या लाटेतून बाहेर येण्याआधी मुख्य धोरण दर  कायम राखले जातील, अशी अपेक्षा आहे.- विवेक राठी, संचालक, नाइट फ्रँक इंडिया 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँक