प्रसाद गो. जोशी
अमेरिकेत बॉण्डवर मिळत असलेल्या जादा परताव्यामुळे परकीय वित्त संस्थांकडून झालेली मोठी विक्री, वाढलेल्या खनिज तेलाच्या किमती, जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेली अस्थिरता यामुळे भारतीय बाजार खाली आला. परिणामी गेले चार सप्ताह सातत्याने वाढत असलेल्या निर्देशांकाला ब्रेक लागला. अर्थसंकल्प जवळ आल्यामुळे बाजार खाली येण्याची शक्यता आता अधिकच आहे.
गतसप्ताहामध्येही पुन्हा परकीय वित्तसंस्थांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली. सप्ताहामध्ये त्यांनी १२,६४३.६१ कोटी रुपयांचे समभाग विकले. त्याचवेळी देशांतर्गत वित्तसंस्थांनी मात्र ५०८.०४ कोटी रुपयांची भाग खरेदी केली. जानेवारी महिन्याचा विचार करता परकीय वित्तसंस्थांनी १५,५६३.७२ कोटी रुपये काढून घेतले, तर देशांतर्गत संस्थांनी ७४३०.३५ कोटी रुपये गुंतविले आहेत.
रिलायन्स अव्वल
बाजार भांडवल मूल्यामधील पहिल्या १० क्रमांकांमध्ये रिलायन्स अव्वल स्थानावर कायम आहे. त्यापाठोपाठ टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी, भारतीय स्टेट बँक, बजाज फायनान्स आणि भारती एअरटेल यांचा क्रमांक लागला आहे.
बाजाराची दिशा अशी ठरणार
आगामी सप्ताहामध्ये विविध आस्थापनांचे येणारे तिमाही निकाल, परकीय वित्तसंस्थांकडून केली जाणारी खरेदी-विक्री यावर बाजाराची दिशा ठरणार आहे. त्यातच डेरिव्हेटिव्हज् व्यवहारांची सौदापूर्ती होत असल्याने बाजार सावध भूमिका घेण्याची शक्यता असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अस्थिरता पहायला मिळणार आहे.