मुंबई : भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. अमेरिकन ब्रोकरेज कंपनी बोफा सिक्युरिटीजच्या मते, भारतीय शेअर बाजाराचा निफ्टी यावर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत ६ टक्के घसरणीसह १४ हजार ५०० पर्यंत खाली येऊ शकतो. तसेच सेन्सेक्सही ४८ हजार या पातळीवर येण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे.
बँक ऑफ अमेरिकेनेही भारतीय शेअर बाजारात घसरण होण्याचा अंदाज वर्तवला आहे. बाजारात होत असलेल्या सततच्या घसरणीमुळे प्रमुख ५०० कंपन्यांपैकी तब्बल ८३ टक्के कंपन्यांचे समभाग यावर्षी तोट्यात राहिले आहेत. यावर्षी निफ्टीमध्ये १२.५५ तर सेन्सेक्समध्ये १२.४४ टक्क्यांची मोठी घसरण झाली.
गुरुवारी शेअर बाजारात पुन्हा वाढ झाल्याची पहायला मिळाली असून, निर्देशांक ४४३ अंकांनी वाढून ५२,२६५ या पातळीवर बंद झाला. निफ्टीही १४३ अंकांनी वाढून १५,५५६ या पातळीवर बंद झाला आहे.
घसरणीची कारणे- भविष्यात अमेरिकेत मंदी- देशासह जगभरात वाढत चाललेली महागाई- कच्च्या तेलाचे वाढलेले दर - युक्रेन-रशिया युद्ध- युद्धामुळे विस्कळीत झालेली पुरवठा साखळी- रुपयाची ढासळलेली पत
कंपन्यांना फटकाबोफा सिक्युरिटीजने अंदाज कमी करताना म्हटले की, पूर्वी कंपन्यांकडे असलेल्या स्वस्त मालाच्या साठ्यामुळे बाजारावर सकारात्मक परिणाम होत होता; पण आता तो साठा संपला आहे. त्यामुळे कंपन्यांचे उत्पन्नही कमी होणार आहे. यासोबतच कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने शेअर बाजार कमजोर होत आहे.
कधीपर्यंत पडझडपुढील दोन-तीन महिन्यांत बहुतेक नकारात्मक घटना घडण्याची शक्यता असून, यामुळे बाजारात घसरण होऊ शकते. नकारात्मक घटना शेअर बाजार घसरण्याचे मुख्य कारण बनतील, जे ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत बाजाराला खाली नेऊ शकतात.
गुंतवणूकदारांनी काय करावे? अहवालात लावण्यात आलेल्या अंदाजानुसार, शेअर बाजारात घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या गुंतवणूक करताना सावध राहून, कंपनीच फंडामेंटली किती स्ट्राँग आहे, हे तपासून गुंतवणूक करावी. दीर्घ काळासाठी गुंतवणूक करण्यासाठी एसआयपी पद्धतीने गुंतवणूक सुरू ठेवावी, असे बाजार तज्ज्ञांनी म्हटले आहे.