लोकसभा निवडणुकीचा एक एक टप्पा पूर्ण होत निकाल जसजसा जवळ येत आहे, तसतशी बाजारातील अस्थिरता वाढताना दिसून येत आहे. त्यामुळेच आगामी सप्ताह हा तेजी-मंदीचाच राहण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे प्रमुख पॉवेल यांच्या भाषणातून व्याजदराबाबत काही संकेत मिळण्याची शक्यता आहे. त्यावर बाजारातील अस्थिरता कमी होणार का हे पाहणे महत्वाचे आहे. तसेच विविध कंपन्यांचे निकाल, भारतामधील पीएमआयची आकडेवारी, ब्रिटनमधील चलनवाढ आणि अमेरिकेतील बेरोजगारीची आकडेवारी बाजारावर परिणाम करू शकते.
परकीय वित्तसंस्थांकडून विक्री सुरूचशेअर बाजारात चालू महिन्याच्या प्रारंभापासूनच परकीय वित्तसंस्थांकडून विक्रीचा सिलसिला सुरू आहे. तो गतसप्ताहातही कायम होता. मे महिन्यात परकीय वित्तसंस्थांनी भारतीय शेअर बाजारामध्ये २८हजार २४२ कोटी रुपयांचे समभाग विकले आहेत. त्याच कालावधीमध्ये या संस्थांकडून रोख्यांमध्ये गुंतवणूक केली जात असल्याचे चित्र आहे. या महिन्यात या संस्थांनी रोख्यांमध्ये १७८ कोटींची गुंतवणूक केली. लोकसभा निवडणुकीमुळे अस्थिरता आहे. बाजारामध्ये मध्यंतरी चांगली वाढ झाल्याने अनेक समभागांचे मूल्य वाढले आहे. शेअर्स विकण्यामध्ये परकीय वित्तसंस्थांचा तोटा नव्हता.