तुम्ही मोबाइल फोन किंवा टीव्हीसह कोणतीही इलेक्ट्रॉनिक उपकरणं खरेदी करता तेव्हा तुम्ही नक्कीच गॅरेंटी वॉरंटीबद्दलही माहिती घेता. आता तुमच्यासाठी आणखी एक दिलासादायक बातमी समोर आलीये. मोबाइल फोन आणि टीव्हीसह इलेक्ट्रॉनिक उत्पादने खरेदी करताना त्याची दुरुस्ती करणं किती सोपं किंवा अवघड असेल हे तुम्हाला कळेल. त्यांच्या रेटिंगवरून ही माहिती तुम्हाला मिळणार आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दुरुस्ती निर्देशांकाची रूपरेषा तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केली असून त्या आधारे हे मानांकन देण्यात येणार आहे. ही समिती १५ नोव्हेंबरपर्यंत आपला अहवाल सादर करेल. त्या आधारे निर्देशांक तयार करण्यात येईल.
ग्राहक व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव भरत खेरा यांच्या अध्यक्षतेखालील समितीला निर्देशांकासाठी मार्गदर्शक तत्त्वं सुचविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ग्राहकांना योग्य माहिती मिळावी आणि उत्पादनांचं शेल्फ लाइफ वाढावं, हा निर्देशांक तयार करण्यामागचा उद्देश आहे. यामुळे वेस्ट मटेरिअलच्या समस्येवर मात करता येणार असल्याचं म्हटलं जातंय. कुठे दुरुस्ती करता येईल आणि कुठे पार्ट्स मिळू शकतील, याची माहिती कंपन्यांनी देणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
अशी असू शकते रेटिंग?
- रिपेरेबिलिटी इंडेक्सच्या आधारे उत्पादनांना १ ते ५ असं रेटिंग देण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
- सर्वात कमी १ रेटिंग अशा उत्पादनांसाठी असू शकतं ज्यांना दुरुस्तीतील एका भागाची दुरुस्ती करण्यासाठी अधिक डिसअसेंब्लीची आवश्यकता असते आणि कायमस्वरूपी उत्पादनाचं नुकसान होण्याचा धोका असतो.
- २ हे रेटिंग मूळ उपकरण निर्माता किंवा कंपनीच्या अधिकृत सेवा केंद्राद्वारे दुरुस्त केलेल्या उत्पादनांसाठी असू शकतं.
- ज्यांना दुरुस्तीमध्ये तांत्रिक कौशल्याची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी ३ रेटिंग असू शकतं. म्हणजे ज्या उत्पादनांचे भाग सहज उघडून वेगळे करता येतात, पण बाकी प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची असते.
कोणाला मिळू शकतं ४,५ रेटिंग?
- ज्यांची टूल्स आणि सुटे भाग कंपनीकडून सहज उपलब्ध करून दिले जातात आणि खराब भाग दुरुस्त करताना इतरांना विनाकारण काढून टाकण्याची आवश्यकता नसते, त्यांना ४ हे रेटिंग दिलं जाऊ शकतं.
- टॉप ५ रेटिंग त्यांच्यासाठी असू शकतं ज्यांचे भाग सहज उपलब्ध आहेतच, परंतु ग्राहक स्वत: मॅन्युअल किंवा व्हिडिओद्वारे स्वत: दुरुस्ती करू शकतात.