दूरसंचार क्षेत्रात रिलायन्स जिओच्या पदार्पणानंतर सर्वच दूरसंचार कंपन्यांचे धाबे दणाणले. सध्या रिलायन्स जिओ, एअरटेलसारख्या कंपन्यांचं दूरसंचार क्षेत्रावर वर्चस्व आहे. दुसरीकडे सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल, व्होडाफोनआयडिया यांसारख्या कंपन्या कर्जाच्या बोज्याखाली आहेत. बीएसएनएल आणि व्होडाफोनआयडियासारख्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात तोटा झाला आहे. सध्या या कंपन्यांवर असलेलं कर्ज मोठं आहे, तर दुसरीकडे मिळणारं उत्पन्न मात्र कमी आहे. या दोन्ही कंपन्यांना पूर्वपदावर आणण्यासाठी डॉएश बँकेकडून एक मोठा सल्ला देण्यात आला आहे. दोन्ही कंपन्यांना एकंदरीत धोक्यांपासून वाचवण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही दूरसंचार कंपन्यांचं मर्जर करण्याचा सल्ला दिला आहे.
सध्या देशातील दूरसंचार क्षेत्राची अवस्था तितकी चांगली नाही. तसंच कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेमुळे सर्वच कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सातत्यानं नव्या ऑफर्स देत आहेत. रिलायन्स जिओ, एअरटेल नंतर व्होडाफोन-आयडिया ही तिसऱ्या क्रमांकाची देशातील दूरसंचार कंपनी आहे. परंतु सध्या कंपनीवर दूरसंचार विभागाचे १.५ लाख कोटी देणं आहे. याशिवाय कंपनीला आपल्या स्पेक्ट्रमची रक्कमही फेडायची आहे. या मोठ्या कर्जाच्या रकमेमुळे कंपनीची चिंता वाढली आहे. तसंच कंपनी या कर्जाच्या बोज्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे.
दरम्यान, डॉएश बँकेनं दिलेला सल्ला अनोखा आहे. सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल आणि व्होडाफोन आयडिया यो दोन्ही कंपन्यांचं मर्जर केलं गेलं तर संकट कमी होऊ शकेल, असा सल्ला डॉएश बँकेनं दिला आहे. एकीकडे बीएसएनएलचं पायाभूत संकट दूर होईल, तर दुसरीकडे व्यापारी तोट्याही घट होईल, असं सांगण्यात आलं आहे.