टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडियाच्या ग्राहक (Vodafone Idea) आणि शेअरहोल्डर्ससाठी एक मोठी बातमी आहे. पैशांच्या थकबाकीमुळे व्होडाफोन आयडियाच्या काही सेवा बंद कराव्या लागणार असल्याचं इंडस टॉवरनं (Indus Tower) दूरसंचार नियामक ट्रायला (TRAI) ला सांगितलं आहे. आपली थकबाकी वसूल करण्यासाठी कायदेशीर मार्गाचाही अवलंब केला जाऊ शकतो. व्होडाफोन आयडिया सातत्यानं आणि जाणीवपूर्वक थकबाकी भरण्यास विलंब करत आहे. कंपनीच्या थकबाकीस विलंब झाल्यामुळे, कंपनीच्या कॅश फ्लोवर परिणाम झाला आहे आणि कंपनीला आर्थिक, तसंच परिचालन आव्हानांना देखील तोंड द्यावे लागत असल्याचं इंडस टॉवरनं म्हटलंय.अशा परिस्थितीत, देशातील सर्वात मोठ्या मोबाइल-फोन टॉवर कंपनीनं व्होडाफोन आयडियाची सेवा बंद केल्यास त्यांचे २२.८३ कोटी ग्राहक प्रभावित होऊ शकतात. सीएबीसी आवाजनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. संकटातून जात असलेल्या वोडाफोन आयडियाचा बाजारातील हिस्सा सतत कमी होताना दिसत आहे. या बातमीनंतर व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये गुरुवारी घसरण झाल्याचं दिसून आलं.Indus Tower नं काय म्हटलंय?इंडस टॉवरचा मुख्य ग्राहक व्होडाफोन आयडियाच आहे. इंडस टॉवरनं भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाला (TRAI) दिलेल्या माहितीनुसार, 'तोट्यात असलेल्या वोडाफोन आयडियाकडे ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत व्याजासह ७,८६४.५ कोटी रुपये देणे बाकी आहे. याशिवाय, पेमेंट डिफॉल्टची परिस्थिती अजूनही कायम आहे.' "Vi च्या डिफॉल्टमुळे, इंडस टॉवरला गंभीर आर्थिक आव्हानांना सामोरं जावं लागत आहे. जर व्होडाफोन आयडिया थकबाकी भरण्यास असमर्थ ठरलं, तर इंडस टॉवरला कायदेशीर कारवाई तर करावीच लागेल, पण काही सेवा बंद करण्याचाही निर्णय घ्यावा लागेल," असं एका मीडिया रिपोर्टमध्ये ट्रायला लिहिलेल्या पत्राचा हवाला देऊन म्हटलंय.व्होडाफोन-आयडियाचंही लेटर"जर दीर्घ कालावधीपर्यंत अशीच स्थिती कायम राहिली तर इंडस टॉवरचे अन्य ग्राहकही पेमेंटमध्ये उशिर किंवा सूट देण्याची मागणी करतील. यामुळे संपूर्ण टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चरवरील जोखीम वाढेल. टेलिकॉम सेवांच्या क्वालिटीवरही याचा परिणाम होईल," अशी प्रतिक्रिया इंडस टॉवरचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रचूर शाह यांनी दिली. दरम्यान, २९ सप्टेंबर रोजी व्होडाफोन आयडियानं ट्रायला एक पत्र लिहिलं होतं. आपली थकबाकी देण्यासाठी सातत्यानं समस्यांचा सामना करावा लागत असल्याचं कंपनीनं म्हटलं.
बंद होणार का Vodafone Idea ची सेवा? डिफॉल्ट होत असलेल्या पेमेटबद्दल Indus Tower नं काय म्हटलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 2:26 PM