नवी दिल्ली : प्रचंड तोटा, करांची थकबाकी व वाढते कर्ज यामुळे हैराण झालेल्या व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेल या दूरसंचार कंपन्यांनी पुढील महिन्यापासून प्री-पेड व पोस्ट-पेड सेवांसाठी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या पाठोपाठ देशातील सगळ्यात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओनेही आपले दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोट्यवधी ग्राहकांना याचा फटका बसणार आहे.जुलै-सप्टेंबर या तिमाहीत व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेल या दोन्ही कंपन्यांना विक्रमी तोटा झाला. दोन्ही कंपन्यांचा एकत्रित तोटा ७४ हजार कोटी आहे. कंपन्या सुरू ठेवायच्या असतील, तर दरवाढ अटळ आहे. दरवाढीमुळे नेटवर्क आणि तंत्रज्ञान विस्तारात गुंतवणूक करणेही त्यांना शक्य होईल.एअरटेलने निवेदनात म्हटले आहे की, दूरसंचार क्षेत्रास सतत भांडवलाची गरज असते. सतत बदलत असलेल्या नव्या तंत्रज्ञानासाठी अधिकाधिक भांडवल लागते. या क्षेत्रातील उद्योगांना सतत व्यवहार्य असावे लागते. डिजिटल इंडिया मोहिमेसाठीही व्यवहार्यता आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर दरवाढ करणे आवश्यक आहे. डिसेंबरपासून एअरटेल आपल्या दरात योग्य प्रमाणात वाढ करणार आहे.गेल्याच आठवड्यात ५१ हजार कोटी रुपयांचा तिमाही तोटा जाहीर करणाऱ्या व्होडाफोन-आयडियाने निवेदनात म्हटले आहे की, दूरसंचार क्षेत्रात प्रचंड वित्तीय तणाव असून, या क्षेत्राशी संबंधित सर्वच हितधारकांनी हे मान्यही केले आहे. ग्राहकांचा जागतिक दर्जाचा डिजिटल अनुभव कायम राहावा यासाठी व्होडाफोन-आयडियाकडून दरात योग्य प्रकारे वाढ केली जाईल. १ डिसेंबरपासून ही लागू होईल. ही दरवाढ ५ ते १0 टक्के या दरम्यान असण्याची शक्यता आहे.असे आहेत यांचे प्लॅनभारती एअरटेलचा किमान प्री-पेड प्लॅन २३ रुपयांपासून (२८ दिवस वैधता) सुरू होतो. किमान पोस्ट-पेड प्लॅन ३९९ रुपयांचा आहे.व्होडाफोन-आयडियाचा किमान प्रीपेड प्लॅन ३५ रुपयांचा तर किमान पोस्ट-पेड प्लॅन ३९९ रुपयांचा आहे.
व्होडाफोन-आयडिया, एअरटेल, जिओची दरवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 2:07 AM