नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या उडान सेवेअंतर्गत विमान सेवेचा विस्तार झाला असून, अनेक पर्यटन स्थळे आणि महत्त्वपूर्ण शहरांना यात जोडले आहे. सिक्किममधील गंगटोक, कर्नाटकातील हम्पी, उत्तराखंडमधील पिथोरगड आणि हिमाचलमधील सिमला या पर्यटनस्थळांना ‘उडान’द्वारे जोडण्यात आले आहे.उडान सेवा एप्रिल २०१७ मध्ये सुरू झाल्यापासूनच्या पहिल्या २० महिन्यांत ११ लाख प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे. विमान प्रवासाच्या नकाशावर नसलेल्या अनेक स्थळांना यामुळे विमानाने जोडले. अशा ३७ विमानतळांवरून १२० मार्गांची सुरुवात झाली. हैदराबाद ते विद्यानगर ही सेवा २१ सप्टेंबर, २०१७ मध्ये सुरू झाली. येथून हम्पी केवळ ४० किमी दूर आहे. आधी बेळगाव विमानतळ २७० किमीवर म्हणजे बरेच दूर होते. विमान उड्डयनचे महासंचालक यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, मार्च, २०१८ पर्यंत बेंगळुुरू-विद्यानगर-बेंगळुरू मार्गावर २,८२० प्रवाशांनी प्रवास केला. एक महिन्यापूर्वी ट्रू जेटने सेवा सुरू केली. त्यानंतर, मार्च ते नोव्हेंबर २०१८ या काळात २८,६७७ प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास केला. या सेवेमुळे सिक्किमच्या पाकयाँगमध्ये पर्यटकांना प्रवेश करणे सोपे झाले. या मार्गावर स्पाइस जेटचे ७८ आसनी विमान रोज सेवा देते. यापूर्वी सिक्किमची राजधानी गंगटोक येथे जाण्यासाठी पर्यटकांना बागडोगरा येथे जावे लागत होते. तेथून रस्त्याच्या मार्गाने ५ ते ६ तासांचा प्रवास आहे. तर दिल्ली-सिमला या मार्गावर ‘उडान’ अंतर्गत १४ हजारहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. उत्तराखंडच्या पंतनगर व पिथोरागडमध्ये २०१७ मध्ये २ लाख ४३ हजार पर्यटकांनी प्रवास केला आहे.>या ६० ठिकाणीहीउडानचे पंख विस्तारत असून, आणखी ६० पर्यटनस्थळीही सेवा सुरू होणार आहे. बिकानेर, जैसलमेर, जोधपूर, उदयपूर, अहमदाबाद, भुज, पोरबंदर, राजकोट आदी शहरांत सेवा विस्तारणार आहे.
प्रमुख पर्यटनस्थळी ‘उडान’ने पसरले पंख
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 4:35 AM