नवी दिल्ली : माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी म्हणून लौकिक असलेल्या विप्रोने (Wipro) मोठी डील केली आहे. जागतिक स्तरावर व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नावाजलेली कॅपको कंपनी (Capco) खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या क्षेत्रातील ही सर्वांत मोठी उलाढाल असल्याचे सांगितले जात आहे. (wipro acquires consultancy firm Capco for 1.45 billion doller)
विप्रोकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, या डीलमुळे बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि BFSI क्षेत्रात विप्रो अधिक मजबूत होईल. तसेच कन्सल्टंसी क्षेत्रात विप्रोचे स्थान अधिक बळकट होईल. कॅपको कंपनीचे मुख्यालय लंडन येथे असून, ही डील तब्बल १.४५ अब्ज डॉलर म्हणजे भारतीय चलनात सांगायचे झाले तर, १० हजार ५०० कोटी रुपयांमध्ये निश्चित झाली आहे.
तुमच्याकडेही LIC पॉलिसी आहे? लवकरच करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठे नुकसान
विप्रोसाठी दुसरी कंपनी खरेदी करण्याचा हा सर्वात मोठा करार असल्याचे सांगितले जात आहे. शेअर बाजाराला यासंदर्भातील माहिती विप्रोने दिली आहे. आगामी जून अखेरीस हा करार पूर्ण होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.
कॅपको कंपनीची सुरुवात १९९८ मध्ये झाली होती. तंत्रज्ञान आणि सल्लागार क्षेत्रातील कंपनी म्हणून जगातील बँकिंग आणि वित्तीय सेवा उद्योगात डिजिटल सल्ला आणि तंत्रज्ञान सेवा देणारी कंपनी म्हणून कॅपको कंपनीची वेगळी ओळख असल्याचे सांगितले जात आहे. कॅपकोची १६ देशांमध्ये ३० ठिकाणी कार्यालये असून, ५ हजार कर्मचारी या कंपनीत कार्यरत आहेत. कॅपकोने सन २०२० मध्ये ७२ कोटी डॉलरची कमाई केली होती.
विप्रोचा नफा २० टक्क्यांनी वाढला
३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाहीत विप्रो कंपनीला तब्बल २० टक्के अधिक नफा झाल्याचे सांगितले जात आहे. तिसऱ्या तिमाहीतील आकडेवारीनुसार, विप्रोला २ हजार ९६७ कोटी रुपयांचा नफा झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत याच तिमाहीत विप्रोचा नफा २ हजार ४५६ कोटी रुपये नोंदवला गेला होता. इतकेच नव्हे, तर या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न १.३ टक्क्यांनी वाढले, असे सांगितले जात आहे.