Join us

‘या’ आघाडीच्या IT कंपनीत वर्क फ्रॉम होम बंद; हायब्रीड मॉडेलचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 7:30 AM

देशातील एक प्रमुख माहिती तंत्रज्ञान कंपनीने १८ महिन्यांपासून सुरू असलेले वर्क फ्रॉम होम संपविण्याची प्रक्रिया सुरू केली.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : देशातील एक प्रमुख माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनी विप्रोने १८ महिन्यांपासून सुरू असलेले वर्क फ्रॉम होम संपविण्याची प्रक्रिया सुरू केली असून, सोमवारपासून आपले अधिकारी कार्यालयांत बोलावून कामास सुरुवात केली आहे. 

विप्रोचे चेअरमन रिषद प्रेमजी यांनी रविवारी एक ट्विट करून ही माहिती दिली. त्यांनी म्हटले की, १८ महिन्यांनंतर विप्रोचे कर्मचारी उद्यापासून आठवड्यातून दोन दिवस कार्यालयात येऊन काम करतील. सर्वांचे  पूर्णत: लसीकरण करण्यात आले असून, सर्व जण कार्यालयांत जाण्यास सज्ज आहेत. सुरक्षितता आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करून कार्यालयांत काम केले जाईल.

विप्रोच्या कार्यालयात ताप मोजण्याची तसेच क्यूआर कोड स्कॅन करण्याच्या व्यवस्थेसह सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात आल्या असून, त्याची माहिती देणारा एक व्हिडिओ रिषद प्रेमजी यांनी  जारी केला आहे.  १४ जुलै रोजी कंपनीच्या ७५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रेमजी यांनी म्हटले होते की, कंपनीच्या भारतातील ५५ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. विप्रोमध्ये २ लाख लोक काम करतात.

हायब्रीड मॉडेलचे दिले होते संकेत

कंपनीच्या वार्षिक अहवालात म्हटले होते की, कोविड-१९ साथीमुळे बदललेल्या परिस्थितीशी कंपनीने तत्काळ जुळवून घेऊन ‘रिमोट वर्किंग’ व्यवस्थेची अंमलबजावणी केली. कंपनीच्या जगभरातील कर्मचाऱ्यांपैकी फक्त ३ टक्के कर्मचारी कार्यालयांतून काम करीत आहेत. आम्ही आमच्या कार्यपद्धतीत रुळलो आहोत. आमच्या ग्राहकांना यशस्वीरीत्या सेवा देत आहोत. त्यांचा आमच्यावर विश्वास आहे. आगामी काळात कामाचे हायब्रीड मॉडेल असू शकेल, यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही. कर्मचाऱ्यांना आठवड्यातील काही दिवस कार्यालयात बोलवायचे आणि बाकीच्या दिवसांत ‘रिमोट वर्किंग’ची सुविधा द्यायची, असे हे मॉडेल असून, तुलनात्मकदृष्ट्या ते लाभदायक आहे, असे तज्ज्ञांना वाटते. 

टॅग्स :विप्रो