Join us

Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 8:56 AM

Wipro Azim Premji : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहेत.

Wipro Azim Premji : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहेत. प्रेमजी इन्व्हेस्ट नैनिताल बँकेतील बहुसंख्य हिस्सा खरेदी करण्यासाठी चर्चा करत आहे. बँक ऑफ बडोदाची सब्सिडायरी असलेल्या नैनीताल बँकेचं डोंगराळ भागात मजबूत बँकिंग नेटवर्क आहे. प्रेमजी इन्व्हेस्ट ही अझीम प्रेमजी यांची फॅमिली इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे. या प्रकरणाशी निगजीत तीन जणांनी यासंदर्भातील माहिती दिली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रस्तावित गुंतवणुकीमुळे उत्तराखंडमध्ये मुख्यालय असलेल्या बँकेचं मूल्य सुमारे ८०० कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. प्रेमजी इन्व्हेस्टनं टर्मशीटवर स्वाक्षरी केली आहे. चर्चांचे अनेक टप्पे पूर्ण झाल्याचीही माहिती समोर आलीये. मात्र, अधिग्रहणाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. 'पहिल्या टप्प्यात ५१ टक्के शेअर्सची विक्री केली जाणार आहे. त्यानंतर उर्वरित मालकी विकली जाईल,' असं सूत्रांनी म्हटलं. 

बँक ऑफ बडोदा सर्व शेअर्स विकणार 

नैनीताल बँकेत सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाचा ९८ टक्के हिस्सा आहे. नैनीताल बँकेतील आपले सर्व शेअर्स विकण्याचा त्यांचा विचार आहे. मात्र, बँक ऑफ बडोदाकडून यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. प्रेमजी इन्व्हेस्ट यांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 

नैनीताल बँकेची स्थापना ३१ जुलै १९२२ रोजी भारतरत्न गोविंद वल्लभ पंत यांनी केली. शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळालेली ही देशातील पहिली खासगी क्षेत्रातील बँक होती. उत्तराखंडच्या (तत्कालीन उत्तर प्रदेश) डोंगराळ भागात वित्तीय सेवा पुरविणं हा या बँकेचा उद्देश होता. 

नैनीताल बँकेचं मजबूत नेटवर्क 

हळूहळू बँकेनं उत्तर भारतातील इतर भागातही आपल्या शाखा उघडल्या. २००३ मध्ये बँक ऑफ बडोदानं नैनीताल बँकेचं अधिग्रहण केलं. आज नैनीताल बँक बँक ऑफ बडोदाची सब्सिडायरी बँक आहे. पाच राज्यांतील १३९ शाखांसह या बँकेची उलाढाल १० हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. सुरुवातीला ग्रामीण भागात शाखा उघडणाऱ्या बँकांपैकी ही एक बँक होती.  

प्रेमजी इन्व्हेस्ट ही भारतीय स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात सक्रिय गुंतवणूकदारांपैकी एक आहे. त्याच्या व्यवस्थापनांतर्गत १० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती आहे. इन्शुरन्स मार्केटप्लेस पॉलिसीबाजार, आयवेअर रिटेलर लेन्सकार्ट, क्रेडिट स्टार्टअप क्रेडिटबी आदींमध्ये कंपनीचा मोठा हिस्सा आहे. प्रेमजी इन्व्हेस्टकडे नॉन बँकिंग फायनान्स कंपनी टीव्हीएस क्रेडिट, अग्रगण्य विमा कंपनी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ आणि पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी एफएसएसमध्ये शेअर्स आहेत. परंतु, बँकेतील त्यांची ही पहिलीच गुंतवणूक असेल.

टॅग्स :विप्रोबँक