Join us

Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2024 2:12 PM

Wipro Share Price :विप्रो ही भारतातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे. सप्टेंबर २०२४ अखेर कंपनीत प्रवर्तकांचा ७२.८० टक्के हिस्सा होता

Wipro Share Price : दोन ब्लॉक डील्समध्ये विप्रोच्या ८.५ कोटी शेअर्सची खरेदी-विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. सीएनबीसी-टीव्ही १८ च्या रिपोर्टनुसार, शेअरविक्री कंपनीच्या १.६२ टक्के इक्विटीइतकी आहे. प्रवर्तक विक्रेता असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. ८ नोव्हेंबर ला विप्रोचा शेअर १.५२ टक्क्यांहून अधिक वधारला. बीएसईवर हा शेअर ५६८.८० रुपयांवर उघडला आणि त्यानंतर कामकाजादरम्यान ५७१ रुपयांवर पोहोचला. कंपनीचं मार्केट कॅप सुमारे ३ लाख कोटी रुपये आहे.

विप्रो ही भारतातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे. सप्टेंबर २०२४ अखेर कंपनीत प्रवर्तकांचा ७२.८० टक्के हिस्सा होता. बीएसईच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात या शेअरमध्ये ५० टक्के वाढ झाली आहे. आठवडाभरात किमती तब्बल ४ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

नफा वाढला

जुलै ते सप्टेंबर २०२४ या तिमाहीत विप्रोचा एकत्रित निव्वळ नफा २१.२ टक्क्यांनी वाढून ३,२०८.८ कोटी रुपये झाला आहे. वर्षभरापूर्वी कंपनीचा नफा २,६४६.३ कोटी रुपये होता. या तिमाहीत कामकाजातून मिळणारं उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत ०.९५ टक्क्यांनी कमी होऊन २२,३०१.६ कोटी रुपयांवर आलं आहे. सप्टेंबर २०२४ तिमाहीत महसूल २२,५१५.९ कोटी रुपये होता.

बीएसईवर १९ जुलै २०२४ रोजी विप्रोचा शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकी ५८० रुपयांवर पोहोचला होता. १० नोव्हेंबर २०२३ रोजी कंपनीचा शेअर ३७६.९० रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. शेअरसाठी अपर प्राइस बँड ६१९.५५ रुपये आणि लोअर प्राइस बँड ५०६.९५ रुपये आहे.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :विप्रोशेअर बाजार