नवी दिल्ली : केंद्रिकृत पेन्शन पेमेंट प्रणालीमुळे (सीपीपीएस) कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) ७८ लाख निवृत्तिवेतनधारकांना आपले निवृत्तिवेतन कोणत्याही बँक शाखेतून काढणे शक्य होणार आहे. १ जानेवारी २०२५ रोजी सीपीपीएस यंत्रणा लागूही करण्यात आली आहे.
केंद्रिकृत पेन्शन पेमेंटप्रणाली भारतात मोठा बदल घेऊन आली आहे. ही प्रणाली राष्ट्रीयस्तरावर पेन्शन पेमेंटची सुविधा देते. त्यामुळे कोणत्याही बँकेच्या शाखेतून पेन्शन काढणे शक्य होते.
ईपीएफओच्या ईपीएस पेन्शनधारकांना या प्रणालीचा लाभ होईल. कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आपल्या मूळ गावी स्थलांतरित व्हायचे असेल तर त्यांच्यासाठी ही प्रणाली एक मोठे वरदानच ठरणार आहे. कर्मचारी कुठल्याही कटकटींशिवाय त्यांचे निवृत्तिवेतन ते आपल्या गावातील बँकेतून काढू शकतील.
पीपीओ हस्तांरण करण्याची गरज नाही
पूर्वी गाव बदलल्यास निवृत्तिवेतन नव्या गावात स्थलांतरित करून घ्यावे लागत असे. त्यासाठी पेन्शन पेमेंट आदेश (पीपीओ) एका कार्यालयाकडून दुसऱ्या कार्यालयाकडे हस्तांतरित करावा लागत असे. आता याची गरजच राहणार नाही.
पीपीओ हस्तांरणाशिवायच निवृत्त कर्मचाऱ्याच्या बदललेल्या गावातील बँकेतून मिळू शकेल. कर्मचाऱ्याची बँक बदलली तरीही पेन्शनवर परिणाम होणार नाही. कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून तो आपली पेन्शन काढू शकेल.