वॉशिंग्टन : महत्त्वाकांक्षी जनधन योजना यशस्वी झाली असली तरी भारतातील १९ कोटी नागरिकांचे अजूनही कुठल्याही बँकेत खाते नाही. बँकेत खाते नसलेल्या लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक लागला आहे.
जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या ‘ग्लोबल फाइंडेक्स डाटाबेस’ या अहवालात ही माहिती दिली आहे. भारतातील एकूण बँक खात्यांपैकी अर्धी बँक खाती गेले वर्षभर निष्क्रिय आहेत, असे यात म्हटले आहे. जनधन योजनेमुळे मार्च २0१८ पर्यंत ३१ कोटी लोक औपचारिक बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेले, असा गौरवपूर्ण उल्लेखही अहवालात करण्यात आला आहे. बँक खाते असणे हे गरिबी निर्मूलनातील पहिले पाऊल समजले जाते.
आंतरराष्टÑीय नाणेनिधीच्या वार्षिक वासंतिक बैठकीच्या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेने हा अहवाल जारी केला आहे. अहवालात म्हटले आहे की, बँकेत खाते असणाऱ्या लोकांची संख्या २0११ पासून दुपटीने वाढून ८0 टक्के झाली आहे. २0१४ मध्ये मोदी सरकारने राबविलेल्या जनधन योजनेमुळे लोक बँकिंग व्यवस्थेशी मोठ्या प्रमाणात जोडले गेले आहेत. तरीही बँकेत खाते नसलेल्या जागतिक लोकसंख्येपैकी ११ टक्के लोक भारतातील आहेत. जगाच्या लोकसंख्येपैकी ६९ टक्के म्हणजेच ३.८ अब्ज प्रौढ लोकांकडे आता स्वत:चे बँक खाते अथवा मोबाइल मनी प्रोव्हायडर आहे. २0१४ मध्ये हे प्रमाण ६२ टक्के, तर २0११ मध्ये अवघे ५१ टक्के होते. (वृत्तसंस्था)
पाकिस्तानात १0 कोटी लोकांची नाहीत खाती
अहवालानुसार, बँक खाती नसलेल्या लोकसंख्येचे प्रमाण चीन आणि भारतात अधिक आहे. चीनमधील २२५ दशलक्ष (२२.५ कोटी) प्रौढ नागरिकांचे बँकेत खाते नाही. भारतातील १९0 दशलक्ष (१९ कोटी), पाकिस्तानातील १00 दशलक्ष (१0 कोटी) आणि इंडोनेशियातील ९५ दशलक्ष (९.५ कोटी) लोकांकडे बँक खाते नाही.
१९ कोटी प्रौढ बँक खात्याविना! जागतिक बँकेचा अहवाल; चीनमध्येही प्रमाण अधिक
महत्त्वाकांक्षी जनधन योजना यशस्वी झाली असली तरी भारतातील १९ कोटी नागरिकांचे अजूनही कुठल्याही बँकेत खाते नाही. बँकेत खाते नसलेल्या लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक लागला आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:44 AM2018-04-21T00:44:22+5:302018-04-21T00:44:22+5:30