नवी दिल्ली : वैद्यकीय उपचार करण्यासाठी तसेच अंपगत्व सहाय्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) खात्यातून आता डॉक्टरांच्या प्रमाणपत्राशिवाय पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ईपीएफच्या चार कोटींपेक्षा जास्त सदस्यांना या तरतुदीचा लाभ होणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना १९५२ नुसार वैद्यकीय उपचारासाठी अथवा उपकरणे खरेदीसाठी खात्यातून पैसे काढायचे असल्यास डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक होते. ही तरतूद आता रद्द करण्यात आली आहे. विहित नमुन्यातील अर्ज आणि स्व-घोषणा (सेल्फ डिक्लेरेशन) या आधारे आता पैसे काढता येतील. ईपीएफओच्या अधिकाºयाने सांगितले की, श्रम मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना १९५२ च्या परिच्छेद ६८-जे आणि परिच्छेद ६८-एन यामध्ये बदल केला आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रमाणपत्राची आता गरज उरलेली नाही. नव्या बदलासंबंधीची अधिसूचना श्रम मंत्रालयाने २५ एप्रिल रोजीच जारी केली आहे. ईपीएफओचे सदस्य परिच्छेद ६८-जे अनुसार स्वत:च्या अथवा अवलंबिताच्या वैद्यकीय उपचारासाठी आपल्या खात्यातून पैसे काढू शकतात. याशिवाय परिच्छेद ६८-एन अनुसार अपंग व्यक्ती अपंगत्वावर मात करणारी उपकरणे खरेदी करण्यासाठी पैसे काढू शकतात. परिच्छेद ६८-जे नुसार ठराविक आजारांसाठी तसेच एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त काळ रुग्णालयात उपचार घेतल्यास अथवा मोठ्या शस्त्रक्रियांसाठी सदस्यांना ईपीएफओ खात्यातून पैसे मिळू शकतात. खात्यातून पैसे देय असलेल्या आजारांत क्षयरोग, कुष्ठरोग, पक्षाघात, कर्करोग, गंभीर मानसिक विकार व हृदय विकार या आजारांचा समावेश आहे. परिच्छेद ६८-जे अनुसार ईएसआयची सुविधा नसलेल्यांनाच पैसे काढण्याची सवलत मिळते. (वाणिज्य प्रतिनिधी)
डॉक्टरांच्या प्रमाणपत्राशिवाय उपचारासाठी पीएफ मिळणार
By admin | Published: April 28, 2017 1:35 AM