Join us

सरकारच्या ‘या’ योजनेचा लाभ घेण्यात महिला पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 10:59 AM

‘पीएम स्वनिधी’ योजनेबाबत संशोधन

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : एसबीआयने जारी केलेल्या एका संशोधन अहवालात मोदी सरकारच्या ‘पीएम-स्वनिधी योजने’ची प्रशंसा केली आहे. फेरीवाल्यांसाठी असलेल्या या सूक्ष्म-वित्त योजनेचे ७५ टक्के लाभार्थी बिगर-सर्वसाधारण प्रवर्गातील असल्याचे अहवालात म्हटले आहे.

अहवालात म्हटले आहे की, पीएम स्वनिधी योजनेचे ४४ टक्के लाभार्थी ओबीसी आहेत. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे लाभार्थी २२ टक्के आहेत. ४३ टक्के लाभार्थी महिला आहेत.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये अहवालाची ठळक वैशिष्ट्ये देऊन म्हटले की, स्टेट बँक ऑफ इंडियाचे सौम्य कांती घोष यांच्या अभ्यासपूर्ण अहवालात पीएम स्वनिधी योजनेमुळे जो परिवर्तनात्मक परिणाम झाला आहे, त्याचे उत्तम चित्र उभे करण्यात आले आहे. या योजनेची सर्वसमावेशकता अहवालात नोंदविण्यात आली आहे; तसेच योजनेमुळे वित्तीय सबलीकरण कसे घडून आले, हे ठळकपणे दाखविण्यात आले आहे.