Join us  

घरबसल्या महिला करू शकतात तगडी कमाई; गृहिणींसाठी भन्नाट बिझनेस आयडिया, वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2023 9:12 AM

आम्ही जे बिझनेस आयडिया तुम्हाला सांगणार आहोत ते तुम्ही घरातून सुरू करू शकता आणि त्यातून फायदा मिळवू शकता.

मुंबई – पैशांसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणे चांगले नाही. मग तुम्ही हाऊसवाइफ का असेना. आपल्या गरजेनुसार खर्च करण्यासाठी आपल्याकडे स्वत:चे पैसे हवेत. जर तुम्हीही गृहिणी असाल आणि तुम्ही खर्चासाठी तुमच्या कुटुंबावर अवलंबून असाल तर आम्ही तुमच्यासाठी कमाईचे चांगले पर्याय घेऊन आलो आहोत. ज्यातून तुम्ही घरबसल्याही चांगला उद्योगधंदा सुरू करून बऱ्यापैकी पैसा कमावू शकता.

आम्ही जे बिझनेस आयडिया तुम्हाला सांगणार आहोत ते तुम्ही घरातून सुरू करू शकता आणि त्यातून फायदा मिळवू शकता. बऱ्याच गृहिणींना स्वयंपाक बनवण्याची खूप आवड असते. दररोज वेगवेगळे पदार्थ तयार करण्याचा त्यांचा इरादा असतो. याच खाण्यासंबंधित बिझनेसबाबत आम्ही बोलतोय. त्यातील विविध आयडिया आहेत ज्यातून तुम्हाला चांगली कमाई होईल. हे उद्योग कोणते आहेत ते जाणून घेऊया.

लोणचे बनवून विका

आपल्या देशात अनेकांना लोणचे खाणे पसंत आहे. थंडी असो वा गरमी लोकं चवीने जेवणासोबत लोणचं खातात. अशावेळी लोणचं विक्री करणे तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. तुम्हाला केवळ तुम्ही बनवलेले लोणचं आपल्या आसपासच्या किराणा दुकानदारांना विक्रीसाठी उपलब्ध करून द्यायचे आहे. त्याशिवाय तुम्ही लोणचं ऑनलाईन मंचावरूनही ग्राहकांना घरपोच करू शकता.

टिफिन सेवा बिझनेस

शिक्षण आणि कामानिमित्त आजकाल अनेकांना त्यांचे राहते घर सोडून शहरात अथवा दुसऱ्या राज्यात जावे लागते. अशावेळी दररोज बाहेर हॉटेलमध्ये जेवणे त्यांच्यासाठी कठीण असते. त्यावेळी लोक घरात बनवलेले जेवण खाणे पसंत करतात. या ग्राहकांसाठी तुम्ही तुमच्या घरात बनवलेले घरगुती जेवण विकून खूप सारे पैसे कमावू शकता. त्यासाठी तुम्हाला टिफिन सर्व्हिसबाबत लोकांपर्यंत माहिती पोहचवली पाहिजे. जसजसं लोकं तुमच्या सर्व्हिसबाबत जाणतील तसंतसं तुमचा व्यवसाय वाढत जाईल.

पँट्री अथवा कॅन्टिनसाठी बनवू शकता जेवण

पँट्री अथवा कॅन्टिनसाठी जेवण बनवणे हादेखील चांगला पर्याय आहे. ते लोकं तुम्हाला निश्चित लोकांची यादी देतील. त्या लोकांना तुम्ही जेवण बनवून त्यांच्या घरी पाठवाल. इतकेच नाही तर एखाद्या ऑफिसशी बोलून तुम्ही कंपनीच्या कार्यालयात कॅन्टिन उभारू शकता. त्यातून जेवण विकून तुम्हाला फायदेशीर कमाई होईल.

फूड ब्लॉगिंग सध्याचा जबरदस्त ऑप्शन

सध्या यूट्यूब, रिल्सच्या माध्यमातून अनेक फूड ब्लॉगर समोर आले आहेत. लोकांना जेवण कसं बनवायचे. वेगवेगळ्या रेसिपी कशा बनवल्या जातात हे पाहायला आवडते. विशेषत: महिला असे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहतात. फूड ब्लॉगिंग करून तुम्हीही पैसे मिळवू शकतात. त्यासाठी तुम्हाला तुम्ही बनवत असलेली रेसिपी कशी बनवता हे रेकॉर्ड करावं लागेल. हा व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर अपलोड करू शकता. तुमच्या रेसिपी पाहून जसंजसं सब्स्क्राईबर वाढत जातील, व्य्हूज मिळतील तर तुम्हाला युट्यूबकडून पैसे दिले जातात.   

टॅग्स :व्यवसायमहिला