Work Life Balance : गेल्या काही वर्षात कॉर्पोरेट क्षेत्रात कामाचा तणाव वाढत असल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी वर्कलाईफ बॅलन्स होत नसल्याने कर्मचारी चिंताग्रस्त आहेत. यातून मानसिक आजार बळावत आहेत. यातूनच एकाच आठवड्यात २ महिलांचे जीव गेल्याने खळबळ उडाली आहे. आज आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लखनौमधील एका खासगी बँकेच्या आवारात खुर्चीवरून पडून एका महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेला कार्यालयातील वाढता कामाचा ताण कारणीभूत असल्याचे आरोप केले जात आहे.
नेमकं काय घडलं?
या बँकेच्या आवारात खुर्चीवरून खाली पडल्याने महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचं सांगितले जात आहे. न्यूज 18 च्या वृत्तानुसार, कामाच्या जास्त दबावामुळे महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप तिचे सहकारी कर्मचारी करत आहेत. सदफ फातिमा या खाजगी बँकेच्या अतिरिक्त उप-उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. कार्यालयाच्या आवारात खुर्चीवरून पडल्याचं सर्वात आधी तिच्या सहकाऱ्यांनी पाहिलं. तात्काळ तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच तिचा जीव गेला होता. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
पुण्यातही अशाच प्रकारे एका महिलेचा मृत्यू
गेल्या आठवड्यात पुण्यातूनही असेच एक प्रकरण समोर आलं होतं. यामध्ये अर्न्स्ट अँड यंग इंडिया कंपनीत काम करणाऱ्या २६ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट एना सेबॅस्टिन पेरायल (Anna Sebastin Perayil) हिचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूनंतर तिच्या आईने एनावर कामाचा खूप दबाव असल्याचा आरोप केला होता. कामाच्या तणावामुळे 20 जुलैला तरुणी तिच्या खोलीत बेशुद्ध पडली. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे तिच्या आईने सांगितले. मृत्यूपूर्वी अनेकदा तिने तिच्यावर कामाचा दबाव असल्याचे म्हटले होते.
अखिलेश यादव यांनी घेतली दखल
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी देखील या घटनेची दखल घेतली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर त्यांनी या संबंधात पोस्टी लिहिली आहे. "लखनऊमध्ये कामाचा दबाव आणि तणावामुळे कार्यालयात खुर्चीवरून पडून महिला बँक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत चिंताजनक आहे.
अशा बातम्या हे देशातील सध्याच्या आर्थिक दबावाचे प्रतीक असल्याचेही अखिलेश यादव यांनी लिहिले आहे. या संदर्भात सर्व कंपन्यांनी आणि अगदी सरकारी विभागांनाही गांभीर्याने विचार करावा लागेल. हे देशाच्या मानव संसाधनाचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. अशा आकस्मिक मृत्यूमुळे कामाच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, असंही यादव यांनी म्हटलं.
वर्क लाईफ बॅलन्सबाबत प्रश्न
या घटनेनंतर देशातील कर्मचाऱ्यांना वर्क लाईफ बॅलन्स राखणे खरोखरच अवघड होत चालले आहे का, असे प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहेत. कामाच्या तणावामुळे कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागत आहे.