सुहास राजदेरकर, गुंतवणूक तज्ज्ञ
काल, ८ मार्च रोजी, ‘जागतिक महिला दिन’ सर्वत्र उत्साहाने साजरा झाला. आज बहुतेक सर्व विभागांमध्ये महिला आघाडीवर आहेत. परंतु ‘आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक’ या विषयामध्ये आजही महिलांचा सहभाग कमी आहे. खरे पाहता, महिलांनी या विषयाकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. त्याची महत्त्वाची कारणे थोडक्यात पाहूया : आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक महिलांसाठी जास्त आवश्यक का?
घटस्फोट, वैधव्य, काही कारणांमुळे लग्न करायचे नाही, पुरुषांच्या तुलनेत महिला कमी वर्षे काम करतात, मुलांचा जन्म आणि संगोपन याकरीता करिअरमध्ये ब्रेक, महिला या पुरुषांपेक्षा जास्त वर्षे जगतात, त्यांचे आयुर्मान जास्त असते, अशी अनेक कारणे आहेत. त्याचप्रमाणे, पुरुषांना मिळणाऱ्या वेतनाच्या तुलनेत, महिलांना मिळणारे वेतन हे साधारणपणे ३० टक्क्यांनी कमी असते. याचाच अर्थ असा होतो की महिलांनी जास्त बचत आणि गुंतवणूक करणे आवश्यक आहे. उदाहरण : पुरुष जर का ५०,००० महिना कमावून १० टक्के बचत करत असेल तर वर्षाकाठी तो ६०,००० रुपये बचत करतो. परंतु महिलेला मात्र ३० टक्के वेतन कमी मिळत असल्याने तिची बचत फक्त ४२,००० रुपये इतकीच होते. भारतामध्ये साधारणपणे २० टक्के कंपन्यांमध्ये ‘संचालक’ पदावर एकही महिला नाही. सर्वात वरच्या स्तरावर अर्थात मोठ्या हुद्द्यांवरील सभासदांमध्ये महिलांची संख्या फक्त ५ टक्के आहे. तात्पर्य, महिलांनी पुरुषांपेक्षा जास्त बचत आणि सुयोग्य गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे.
हे नक्की करा...
- हल्ली बहुतेक मुली एकुलत्या एक असतात. त्यामुळे लग्न झाले तरी आई-वडिलांची सुद्धा जबाबदारी असते. अशा वेळी, आई वडिलांना त्यांच्या बहुतेक मालमत्ता विकून ती गुंतवणूक अशी करून द्या की त्यामधून त्यांना दरमहा पैसे मिळतील. त्यामुळे, तुमची जबाबदारी खूप कमी होऊन तुम्हाला तुमच्या घराकडे लक्ष देता येईल.
- घराकरिता कर्ज घेत असाल तर, घरामध्ये पहिले नाव तुमचे ठेवा, कारण व्याज दर थोडा कमी असतो.
- तुम्ही नोकरी करीत असाल तर कंपनीने तुमच्यासाठी घेतलेल्या वैद्यकीय विम्यामध्ये तुमच्या पालकांचे नाव घाला आणि नवºयाच्या आॅफिसमधील विम्यात त्यांच्या पालकांची नावे असू द्या.
- तुम्ही कमावत्या असाल तर तुमचा ‘स्वतंत्र’ आरोग्य विमा जरूर काढा. आयुर्विमा आणि गुंतवणूक वेगळे ठेवा.
- नवºयाने कोठे गुंतवणूक केली आहे ते समजावून घ्या व प्रत्येक गुंतवणुकीमध्ये तुमचे तसेच मुलांचे नाव असू द्या.
- जास्त काळ, वर्षे काम करा ज्याने बचत आणि गुंतवणूक चांगली होऊन निवृत्तीनंतर ताण येणार नाही.
- गुंतवणूक करतांना तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तीची मदत घ्या व योजना समजावून घ्या. गुंतवणूक आणण्याचे ‘लक्ष’ अर्थात ‘टार्गेट’ असणाºया व्यक्तींकडून शक्यतो गुंतवणूक करू नका.