Join us  

पर्यटन क्षेत्रात महिला वाढणार; उद्याेगांसाठी विशेष सवलत देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2023 10:51 AM

पर्यटन विकास महामंडळाचा निर्णय; विमा योजनेतही सहभागी करून घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पहिले महिला संचलित पर्यटक निवास सुरू केले. त्यानंतर आता पर्यटन क्षेत्रात महिलांचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्यातील महिला उद्योजकांना विशेष सवलत देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्याचप्रमाणे या क्षेत्रातील महिलांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विमा योजनेतही सहभागी करून घेण्यात येणार आहे. यामुळे या क्षेत्रात महिलांचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे. 

बचत गटांना जागा देणार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालमत्तांच्या ठिकाणी, महिला बचत गटांना हस्तकला, कलाकृती, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ आदींच्या विक्रीसाठी स्टॉल, जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

विविध उद्योगांना संधीराज्यातील प्रत्येक तालुक्यामधील पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालविलेल्या दहा पर्यटन व्यवसायांना, म्हणजेच होम स्टे, हॉटेल, रेस्टारंट, टूर ॲण्ड ट्रॅव्हल एजन्सी आदी उभारणीसाठी प्रोत्साहन व सवलती दिल्या जातील. नोंदणीकृत व्यवसायांमध्ये कार्यरत महिला सहल मार्गदर्शक, महिला वाहन चालक, महिला सहल संचालक व इतर महिला कर्मचाऱ्यांना यात सामील करून घेण्यात येईल.

महिला पर्यटकांनाही आकर्षक सुविधाnमहामंडळाच्या टूर ऑपरेटरमार्फत आयोजित पर्यटन सर्किट, पॅकेजेसमध्ये महिला पर्यटकांना विविध सवलती देण्यात येत आहेत.  सर्व रिसॉर्ट्स, युनिट्समध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ठराविक कालावधीत फक्त ऑनलाइन बुकिंगमध्ये ५० टक्के सवलत दिली जाणार आहे.nमहामंडळाच्या रिसॉर्ट्समध्ये महिला पर्यटकांसाठी, अपंग किंवा वृद्ध महिलांकरिता लिफ्टजवळच्या खोल्या उपलब्ध करून देण्यास प्राधान्य, महिलांसाठी विशेष खेळ, मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन, महिला पर्यटकांच्या विविध गटांसाठी अनुभवात्मक टूर पॅकेजेस, ज्येष्ठ महिला नागरिकांसाठी सहल अशा विविध विशेष सेवासुविधा पुरविण्यात येतील.

पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याच्या उद्देशाने महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे या क्षेत्रातील संधीही वाढतील आणि महिला सक्षमीकरण यासाठी मदत होणार आहे.     - दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ  

टॅग्स :पर्यटनव्यवसाय