नवी दिल्ली : कामाचा ताण, दडपण, कामाशी संबंधित अपघात, आजारपण इत्यादी कारणांमुळे जगभरात ३० लाख कामगारांचा मृत्यू झाला. त्यापैकी ६३ टक्क्यांपेक्षा जास्त मृत्यू आशिया व प्रशांत क्षेत्रात नाेंदविण्यात आले आहेत. ही धक्कादायक आकडेवारी २०१९ची असून आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या ताज्या अहवालातून ही माहिती समाेर आली आहे. आठवड्याला ५५ तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ काम करणे, हे यामागील सर्वात माेठे कारण असल्याचे अहवालात म्हटले आहे. यासंदर्भात सर्व देशांनी कामगारांच्या सुरक्षेसाठी सक्षम उपाययाेजना करण्याचे आवाहन केले आहे.
‘काॅल फाॅर सेफर ॲण्ड हेल्दीयर वर्किंग एन्व्हायर्नमेंट’ या नावाने अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यावर सिडनी येथील कामाच्या ठिकाणी संरक्षण आणि आराेग्य यावर आयाेजित परिषदेत चर्चा झाली.
२६लाख लाेकांचा मृत्यू हा कामाशी संबंधित आजारपणामुळे झाला आहे.
३.३लाख मृत्यू अपघातामुळे झाले आहेत.
- छाती तसेच फुप्फुसाच्या कर्कराेगाचे प्रमाण वर्ष २००० ते २०१६ या कालावधीत दुप्पट झाले आहे.
ही आहेत धाेकादायक कामाची ठिकाणे
खाणकाम, बांधकाम व इतर युटिलिटी क्षेत्रे ही सर्वाधिक धाेकादायक कार्यस्थळे असल्याचे अहवालात म्हटले आहे.
२०% पेक्षा घट दमा, विषारी वायू तसेच धुरामुळे हाेणाऱ्या मृत्यूंमध्ये झाली आहे.
भारतातील लाेकांचे कामाचे तास किती?
- ४७.७ तास आठवड्याला भारतीय लाेक काम करतात.
- ७व्या स्थानी भारत आहे.
- कतर, कांगाे, लिसाेथे, भूतान, गाम्बिया आणि संयुक्त अरब अमिरात या देशांमध्येच भारतापेक्षा जास्त सरासरी कामाचे तास आहेत.
- ७० तास आठवड्याला काम करावे, हे काेणत्याच देशाच्या कायद्यात बंधनकारक नाही.
- ४८ तास आठवड्याचे कामाचे तास असावे, असे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने सुचविले आहे.