Join us

वर्क फ्रॉम होम की ऑफिस-ऑफिस?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2023 10:40 AM

कोरोना साथीनंतर जगभरातील कार्यसंस्कृती बदलली.

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : कोरोना साथीनंतर जगभरातील कार्यसंस्कृती बदलली. कोविड लॉकडाऊनमुळे दीर्घकाळ वर्क फ्रॉम होम चालले. कोरोना साथ निवळल्यानंतर काही दिवस घरून, तर काही दिवस ऑफिसातून अशी हायब्रीड कार्यसंस्कृती सुरू झाली. आता कंपन्या कर्मचाऱ्यांना पूर्णत: ऑफिसातून काम करण्यास सांगत आहेत. तथापि, अनेक कर्मचाऱ्यांना हायब्रीड कार्यपद्धती सोडवेनाशी झाली आहे. काम आणि व्यक्तिगत आयुष्य यातील सुयोग्य समतोल हायब्रीड कार्यपद्धतीत साधला जात असल्यामुळे कर्मचाऱ्यांचा तिच्यावर जीव जडला आहे. मानसिक सुरक्षा हाही एक घटक त्यामागे आहे.

आयटी कंपन्यांचे हायब्रीड मॉडेल

काेवीडनंतरच्या काळात मानसिक सुरक्षा या शब्दाचा वापर कार्यस्थळी मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. जोखीम पत्करणे, कल्पना व चिंता व्यक्त करणे, प्रश्न उपस्थित करणे आणि चुका मान्य करणे हे नकारात्मक परिणामांची चिंता न करता व्हायला हवे. नुकतेच टीसीएसने कर्मचाऱ्यांना आठवड्यातील किमान तीन दिवस कार्यालयात येऊन काम करण्यासाठी प्रोत्साहित करण्यास सुरुवात केली आहे. बहुतांश आयटी कंपन्या अशाच प्रकारचे हायब्रीड मॉडेल राबवीत आहेत.

ऑफिसात सर्वांत कमी असते मानसिक सुरक्षा

एका अभ्यासानुसार, वर्क फ्रॉम होम आणि हायब्रीड कार्यपद्धती यांच्या तुलनेत ऑफिसात लोक कमी मानसिक सुरक्षा अनुभवतात. एचआर सोल्युशन्स अँड स्टाफिंग संस्था ‘जीआय ग्रुप होल्डिंग’ने केलेल्या अभ्यासानुसार, पुरुष कर्मचाऱ्यांना महिलांच्या तुलनेत अधिक सुरक्षित वाटते. 

हायब्रीड पद्धतीत वर्क-लाइफ समतोल अधिक

‘जीआय ग्रुप होल्डिंग’च्या भारतातील व्यवस्थापक सोनल अरोरा यांनी सांगितले की, ‘हायब्रीड पद्धतीत कर्मचारी अधिक लवचिकता आणि वर्क-लाइफ समतोल प्राप्त करू शकतात. त्यामुळे या पद्धतीला पसंती मिळत आहे. 

मानसिकदृष्ट्याही कार्यस्थळ सुरक्षित हवे

‘पब्लिसिस सॅपिएंट’चे में भारत आणि आशिया-प्रशांतच्या संचालक विशाखा दत्ता यांनी सांगितले की, कार्यस्थळ केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिकदृष्ट्याही सुरक्षित असायला हवे. 

हे संकेत धोक्याचे

कंपन्यांच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांचे पूर्वग्रह, वाईट वर्तणूक आणि वारंवार, तसेच अचानक सुट्या घेणे या बाबी सर्वाधिक जोखमीच्या असतात. कार्यस्थळ मानसिकदृष्ट्या असुरक्षित असल्याचे संकेत त्यातून मिळतात.