टोकियो : अनेकांना आठवड्यात सहा दिवस काम केल्यानंतर एक दिवसच रजा असते, तर काहींना आठवड्याचे दोन दिवस साप्ताहिक सुट्ट्या मिळतात, पण आठवड्यात चारच दिवस काम केले आणि तीन दिवस सुटी मिळाली तर? होय. असा प्रयोग झाला आणि मुख्य म्हणजे तो यशस्वी ठरला आहे.
मायक्रोसॉफ्ट कंपनीने जपानमधील आपल्या कर्मचाऱ्यांना वर्कलाइफ चॉइस चॅलेंजअंतर्गत एका महिन्यात तीन दिवस साप्ताहिक सुट्टी दिली. म्हणजे कर्मचाऱ्यांना केवळ तीनच दिवस काम करावे लागले. या प्रयोगाचे निष्कर्ष कंपनीने जाहीर केले असून, याचा कंपनीला फायदाच झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या प्रयोगामुळे कर्मचाºयांची उत्पादकता ३९.९ टक्क्यांनी वाढल्याचे कंपनीने म्हटले आहे.याखेरीज कंपनीचा विजेचा खर्च २३.१ टक्क्यांनी कमी झाला. कागदाचा वापर तर ५८ टक्क्यांनी कमी झाला. शिवाय कामाचे दिवस कमी झाल्याने कर्मचारीही खूश झाले आणि त्यांनी या काळात अजिबात अतिरिक्त सुटी घेतली नाही. तसेच ९२ टक्के कर्मचाºयांनी ही योजना पुढेही चालू ठेवावी, असेच मत व्यक्त केले. आठवड्यात केवळ चारच दिवस काम असल्याने एरवी मीटिंगमध्ये जाणारा वेळही खूप कमी झाला. मीटिंगसाठी सर्वांनी एकत्र जमण्यापेक्षा व्हर्च्यअल मीटिंग झाल्या आणि आपल्या जागी बसूनच कर्मचाºयांनी चर्चा करून निर्णय घेतले.
कर्मचाºयांनी आठवड्यात केवळ चार दिवस काम करूनही उत्पादकता व कार्यक्षमता वाढणार असेल तर कायमस्वरूपी अशी योजना अनेक कंपन्या राबवू शकतील, अशी चर्चा जपानमध्ये या प्रयोगानंतर सुरू झाली आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनी पुन्हा पुढील वर्षी उन्हाळ्यात हाच प्रयोग करेल, असा अंदाज आहे. यावर्षीही हा प्रयोग एप्रिलमध्येच करण्यात आला होता. (वृत्तसंस्था)न्यूझीलंडमध्येही प्रयोग ठरला यशस्वीअर्थात, मायक्रोसॉफ्टच्या आधीही जगभरातील काही कंपन्यांनी आठवड्यात केवळ चार दिवस काम हा प्रयोग केला असून, त्यांचाही अनुभव चांगला आहे. न्यूझीलंडमधील परपेच्युअल गार्डिअन या कंपनीनेही हाच प्रयोग आधी केला होता आणि तिथेही उत्पादकतेत वाढ आणि कर्मचारी आनंदी असल्याचे उघड झाले होते. जिथे चारच दिवस काम असते, तेथील कर्मचारी अधिक जोमाने व उत्साहाने काम करतात, त्यांचे कामात पूर्ण लक्ष असते आणि त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत सुधारणा होते, असे आढळून आले आहे.