नवी दिल्ली : स्थानिक बाजारपेठेत वाढलेली मागणी आणि चांगल्या गुंतवणुकीच्या बळावर भारताची अर्थव्यवस्था २०२३-२४ या आर्थिक वर्षात ६.३ टक्के दराने वाढेल, असा अंदाज जागतिक बँकेने मंगळवारी जारी केलेल्या अहवालात वर्तविला आहे.
एप्रिलमधील अहवालात जागतिक बँकेने भारताचा जीडीपी दर ६.३ टक्के इतका राहील, असा अंदाज वर्तविला होता. २०२२-२३ मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेने ७.२ टक्के इतका वृद्धीदर नोंदविला. खाद्यपदार्थांच्या किमतीत झालेली घट व सरकारी उपायांमुळे वस्तूंच्या पुरवठ्यात झालेली सुधारणा यामुळे किरकोळ महागाई ५.९ टक्के इतकी राहील, असे अहवालात म्हटले आहे. जागतिक बँकेचे भारतातील संचालक तानो कुआमे म्हणाले की, गुंतवणुकीत वाढीने भारताला जागतिक स्तरावरील संधीचा लाभ घेण्यासाठी अनुकूल स्थिती उत्पन्न होईल. (वृत्तसंस्था)