World Biggest Fraud : आर्थिक घोटाळा म्हटलं की तुमच्या डोळ्यांसमोर विजय मल्ल्या, नीरव मोदी, ललित मोदी अशी नावं येत असतील. या पळपुट्या उद्योगपतींना देशातील अनेक बँकांना हजारो काटी रुपयांना आर्थिक गंडा घातल्याचे तुम्ही जाणता. मात्र, आता ज्या घोटाळ्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत, तो वाचून तुमचे डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाही. कारण, हा जगातिल सर्वात मोठा आर्थिक घोटाळा मानला जातो. आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी फसवणूक २७ अब्ज डॉलर्सची (सुमारे २.२६ लाख कोटी रुपये) उघडकीस आली आहे. मोठी गोष्ट म्हणजे ही फसवणूक पुरुषाने नाही तर एका महिला व्यावसायिकाने केली आहे. न्यायालयाने तिला सुनावलेली शिक्षा वाचूनही तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कारण, आपल्याकडे आर्थिक फसवणूक करणाऱ्याला ५ वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
व्हिएतनाम या छोट्या देशात ही घटना घडली आहे. जिथे मालमत्ता व्यावसायिक ट्रांग मी लॅन (वय ६८) यांनी सर्वसामान्य नागरिक आणि देशातील बँकांची फसवणूक करून २७ अब्ज डॉलर्स पचवले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या मंगळवारी व्हिएतनामी न्यायालयाने लॅनला फाशीची शिक्षा सुनावली. यानंतर लॅनने फसवणुकीचे पैसे परत करण्याचे आणि शिक्षा कमी करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, सरकारी वकिलाने न्यायालयाला कोणतीही दयामाया दाखवू नये आणि कठोर शिक्षा देण्याची विनंती केली आहे.
कशी झाली फसवणूक?
लॅन ही व्हिएतनाम देशातील मोठी मालमत्ता व्यावसायिक आहे. तिने सॅगन कमर्शियल बँक (SCB) नावाची स्वतःची वित्तीय संस्था देखील उघडली आहे. लॅनने हजारो लोकांचे पैसे या बँकेत जमा केले. याशिवाय व्हिएतनामची सरकारी बँक स्टेट बँक ऑफ व्हिएतनाम (एसबीव्ही) ने देखील या बँकेला स्थिर करण्यासाठी भांडवल पुरवले होते. नंतर लॅनने या सर्व निधीचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाले आणि त्यानंतर तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
ही रक्कम जीडीपीच्या ६ टक्के
लॅनविरुद्धचा खटला एप्रिलमध्येच सुरू झाला होता. ज्यामध्ये ती १२.५ अब्ज डॉलर्सच्या फसवणुकीसाठी दोषी आढळला होती. परंतु, नंतर अभियोजन पक्षाने सांगितले की तिच्या फसवणुकीमुळे एकूण २७ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे, जे देशाच्या जीडीपीच्या निम्मे आहे. एवढ्या मोठ्या फसवणुकीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. लॅनला यापूर्वीच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात शिक्षा झाली होती. या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर आता तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
लॅनकडे आता कोणते पर्याय?
न्यायालयाने तिला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर, ती कमी करण्यासाठी लॅनने विनंती केली आहे. फसवणुकीचे सर्व पैसे परत करण्याची तयारी तिने दर्शवली आहे. त्यासाठी ती तिच्या रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी व्हॅन थिन्ह फॅट आणि एससीबीच्या मालमत्ता विकण्यास तयार आहे. सर्व मालमत्ता विकून जी काही रक्कम मिळेल, ती तिला सरकारला परत करायची आहे. लॅन म्हणाली, मला स्वत:ला आणि माझ्या कुटुंबाला कोणताही त्रास होऊ द्यायचा नाही. देशाच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याने मला दु:ख झाले आहे.
काय आहे कायदा?
लॅन यांनी दिलेल्या प्रस्तावाबाबत व्हिएतनाममध्ये योग्य कायदा आहे. व्हिएतनामच्या कायद्यानुसार, जर लॅनने फसवणुकीच्या एकूण रकमेपैकी एक तृतीयांश रक्कम (सुमारे ३३ टक्के रक्कम) म्हणजेच सुमारे ७० हजार कोटी रुपये दिले तरी तिची शिक्षा कमी होऊ शकते. मात्र, तिही प्राधिकरणाला सहकार्य करावे लागेल, तरच न्यायालय त्यावर विचार करू शकेल. दुसरीकडे, फिर्यादी कोणतीही सूट देण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसते.