World First Budget: नरेंद्र मोदी सरकारचा (Narendra Modi Government) यंदाचा अर्थसंकल्प याच आठवड्यात सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. संसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच लोकसभेत सकाळी ११ वाजता त्यांचं अर्थसंकल्पीय भाषण सुरू होईल. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांचं हे सलग आठवं अर्थसंकल्पीय भाषण असेल.
केंद्रीय अर्थ मंत्रालयात म्हणजेच नॉर्थ ब्लॉकमध्ये सध्या अर्थसंकल्प बनवण्याची तयारी जोरात सुरू आहे. गेल्या आठवड्यात अर्थ मंत्रालयात हलवा सोहळा पार पडला. यानंतर अंदाजपत्रक तयार करून छापणाऱ्या मुख्य कर्मचाऱ्यांना नॉर्थ ब्लॉकमध्येच थांबवण्यात आलंय. आता संसदेत अर्थसंकल्प सादर होईपर्यंत त्यांना ना त्यांच्या घरी जाता येणार आहे, ना त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधता येणार आहे. त्यांच्याकडे मोबाइलफोनही नसेल.
बजेट शब्द कुठून आला?
बजेट हा शब्द लॅटिन भाषेतील 'बल्गा' या शब्दापासून तयार झाला आहे. फ्रेन्चमध्ये याला बुगुएट असंही म्हणतात. हा शब्द इंग्रजीत म्हटल्यावर तो बोजेट झाला. पुढे या शब्दाला बजेट असं संबोधलं जाऊ लागलं. जगातील जवळजवळ सर्वच देशांनी याचा अवलंब केला.
पहिला अर्थसंकल्प कोणत्या देशात?
सर्वप्रथम कोणत्या देशानं अर्थसंकल्प सादर केला, याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यात सर्वप्रथम इंग्लंडचं नाव पुढे आलं. खरे तर देशाचा अर्थसंकल्प सादर करण्याची सुरुवात तिथूनच झाली. इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार पहिला अर्थसंकल्प १७६० साली सादर करण्यात आला होता. त्यानंतर १८१७ मध्ये फ्रान्समध्ये आणि १९२१ मध्ये अमेरिकेत अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
भारतात कधी सुरुवात?
भारतात बजेटची सुरुवात इंग्रजांच्या काळात झाली. १८५७ च्या उठावानंतर जेम्स विल्सन या थोर अर्थतज्ज्ञाला इंग्रजांनी आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी भारतात बोलावलं. ७ एप्रिल १८६० रोजी त्यांनी भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला. २६ नोव्हेंबर १९४७ रोजी आरके षनमुगम चेट्टी यांनी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला.
अर्थसंकल्पाकडून अपेक्षा
आपल्या देशातील मध्यमवर्गाला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. वाढत्या महागाईच्या काळात त्यांना अर्थसंकल्पातून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. यंदाही मध्यमवर्ग मोठ्या आशेनं १ फेब्रुवारी २०२५ ची वाट पाहत आहे.