Join us             

शंभरीच्या ब्युटिशियन आजींना जगाचा सलाम!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 8:55 AM

जगातील सौंदर्याची बाजारपेठ दिवसेंदिवस वाढतेच आहे. कारण प्रत्येकाला सुंदर दिसायचं आहे, सुंदर व्हायचं आहे. जगात अगदी प्रत्येकाला, लहानापासून ते मोठ्यापर्यंत, तरुणाईपासून ते म्हाताऱ्यापर्यंत सर्वांनाच आपल्या तारुण्याचा जलवा दाखवायचा आहे.

जगातील सौंदर्याची बाजारपेठ दिवसेंदिवस वाढतेच आहे. कारण प्रत्येकाला सुंदर दिसायचं आहे, सुंदर व्हायचं आहे. जगात अगदी प्रत्येकाला, लहानापासून ते मोठ्यापर्यंत, तरुणाईपासून ते म्हाताऱ्यापर्यंत सर्वांनाच आपल्या तारुण्याचा जलवा दाखवायचा आहे. या वयातही मी किती सुंदर दिसतो, दिसते हे दाखवून लोकांना आश्चर्यचकित करायचे आहे. मी अजून कशातही कमी नाही, हे दाखवून देण्याचा त्यांचा आटापिटा असतो, आहे. त्यामुळेच सौंदर्याच्या या बाजारपेठेला मरण नाही असं म्हटलं जातं. 

२०२२ साली जगातील सौंदर्याची ही बाजारपेठ ४३० अब्ज डॉलर्सची होती, २०२७ मध्ये ती साधारण सहाशे अब्ज डॉलर्स होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इतर कोणत्याही ‘कन्झ्युमर प्रॉडक्ट’पेक्षा सौंदर्याची ही बाजारपेठ जास्त वेगानं लोकांचा आणि त्यांच्या खिशाचा कब्जा घेत आहे. त्यामुळेच या बाजारपेठेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे. 

अर्थात सौंदर्याचं हे मार्केट जगभरात वाढवण्याचं आणि पसरवण्याचं मोठं काम आजवर केलं आहे ते या क्षेत्रातील वेगवेगळ्या कंपन्या, पुरुष आणि स्त्रियांची ब्युटिपार्लर्स, तिथले सौंदर्यतज्ज्ञ, ब्युटिशियन्स, सौंदर्य सल्लागार आणि सौंदर्यासाठी उत्सुक असलेले जगभरातले ग्राहक यांनी.जगभरातील ब्युटिपार्लर्स आणि ब्युटिशियन्स यांनी या व्यवसायाच्या माध्यमातून कंपन्यांना आणि स्वत:ला तर आर्थिक स्तरावर मोठं केलंच, पण ग्राहकांनाही नवनव्या ब्युटी प्रॉडक्ट्सची सवय लावली. ही ब्युटी प्रॉडक्ट्स चांगली की वाईट, त्यामुळे खरोखरच सौंदर्य वाढतं, घटतं की तसचं राहतं, हा भाग वेगळा, पण सौंदर्याची ही बाजारपेठ घरोघरी नेण्यात त्यांचा खूप मोठा हातभार होता.

याच यादीत एक अनोखं नाव आता जगभरात गाजतं आहे आणि त्याबद्दल लोकांनी अचंब्यानं तोंडात बोटंही घातली आहेत. जपानच्या एका ब्युटिशियन महिलेचा गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनं नुकताच सन्मान केला आहे. या महिलेचं नाव आहे टोमोको होरिनो. जपानच्या फुकुशिमा येथे राहणाऱ्या या महिलेचा गिनेस बुकनं का सन्मान केला असावा? - त्याचंही एक अनोखं कारण आहे. ही ब्युटिशियन, सौंदर्य सल्लागार तब्बल शंभर वर्षांची आहे आणि अजूनही ती लोकांना सौंदर्याचा सल्ला, टिप्स देते. सौंदर्य प्रसाधनं विकते. गेल्या साठ वर्षांपेक्षा अधिक काळापासून ती हा व्यवसाय करते आहे आणि आजपर्यंत ज्या ज्या ग्राहकांना तिनं सेवा दिली, सौंदर्य प्रसाधनं विकली, त्यांच्या सौंदर्याला चार चांद लावायला मदत केली, ते सर्व जण खुश आहेत असं अनेकांचं म्हणणं आहे. 

आपल्या प्रत्येक ग्राहकाला या आजीबाईंनी नुसतं खुशच केलं नाही, तर त्यांना योग्य तोच सल्ला दिला, त्यांचं सौंदर्य उठावदार करण्यात मदत केली, त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भर घातली आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढवला! टोमोको आजींचं वैशिष्ट्य म्हणजे त्या आजही अतिशय फिट आहेत, कार्यरत आहेत, ब्युटिशियन म्हणून काम करताहेत आणि आजही त्यांचे ठरलेले ग्राहक आहेत. त्यांचे हे ग्राहक या आजींशिवाय कोणाकडूनही सौंदर्याचा सल्ला, टिप्स घेत नाहीत. ब्युटिशियन म्हणून त्यांची आजही केवळ या आजींनाच पसंती आहे. 

काही कंपन्यांच्या विक्री एजंट, कमिशन एजंट म्हणूनही या आजींनी काम केलं. त्या कंपन्याही या आजींच्या कामावर खुश आहेत. सौंदर्य प्रसाधन निर्मिती आणि विक्रीत पोला या कंपनीचं मोठं नाव आहे. केवळ या कंपनीसाठीच टोमोको आजी गेल्या साठ वर्षांपेक्षाही जास्त काळापासून ‘कमिशन एजंट’, विक्री प्रतिनिधी म्हणून काम करताहेत. कंपनीचं म्हणणं आहे, आजी आजही आमच्यासाठी काम करताहेत याचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे. आमच्या कंपनीचीही प्रतिमा त्यांनी वाढवली आहे. आमचे प्रॉडक्ट्स त्या आजही विकतात. त्यांचे किमान आठ ग्राहक अजूनही फिक्स आहेत. दर महिन्याला त्या आजही आमची जवळपास एक लाख येन (सुमारे ६८७ डॉलर्स) इतक्या रकमेची प्राॅडक्ट्स विकतात! त्यांच्या या कर्तृत्वाचा कोणाला अभिमान असणार नाही? टोमोको आजींचे ग्राहक म्हणतात, आमचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. कुठलाही किंतु मनात न आणता आम्ही स्वत:ला त्यांच्याकडे सोपवतो आणि त्यानंतर आमच्यात झालेल्या बदलानं आम्ही स्वत:च अचंबित होतो! 

‘तेच’ माझ्याही सौंदर्याचं राज! टोमोको आजीही एका व्यापक ध्येयानं पछाडलेल्या आहेत. त्या म्हणतात, पैसा मिळवणं ही अतिशय गौण बाब आहे. मी ती कधीच महत्त्वाची मानली नाही. माझे ग्राहक ‘सौंदर्यवान’ आणि आनंदी होताना पाहून मी स्वत:च इतकी खुश होते की त्यापुढे पैशांचं मोल काहीच नाही. त्यांच्यातला हा बदल मी स्वत:ही खूप एन्जॉय करते. त्यामुळेच मी आजवर टिकून आहे. माझ्याही कार्यक्षमतेचं आणि सौंदर्याचं राज तेच आहे!

टॅग्स :आंतरराष्ट्रीय