Ashwin Suryakant Dani passes away : प्रसिद्ध पेंट ब्रँड एशियन पेंट्सचे सह-संस्थापक अश्विन सूर्यकांत दाणी यांचं गुरुवारी वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झालं. ते एशियन पेंट्स लिमिटेडचे नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन होते. डिसेंबर १९९८ ते मार्च २००९ पर्यंत ते कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. एशियन पेंट्स ही भारतातील सर्वात मोठी पेंट कंपनी असून १६ देशांमध्ये कार्यरत आहे.
अश्विन दाणी यांना त्यांचे वडील सूर्यकांत यांच्याकडून एशियन पेंट्सचा वारसा मिळाला. यांची सुरुवात १९४२ मध्ये सूर्यकांत दाणी आणि इतर तीन लोकांनी केली होती. अश्विन दाणी यांच्या शिक्षणाबद्दल सांगायचं तर त्यांनी १९६६ मध्ये मुंबई विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर, अक्रॉन विद्यापीठातून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी ते अमेरिकेत गेले.
केव्हापासून कंपनीसोबत
कारकिर्दीच्या सुरुवातीला दाणी यांनी डेट्रॉईटमध्ये एक केमिस्ट म्हणून काम केलं. नंतर १९६८ मध्ये, ते एशियन पेंट्स या त्यांच्या कौटुंबिक व्यवसायात सामील झाले. १९९७ मध्ये, ते एशियन पेंट्सचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक झाले. दाणी यांच्या नेतृत्वाखाली, एशियन पेंट्सनं जागतिक स्तरावर आपल्या कार्याचा विस्तार केला आणि ती जगातील आघाडीच्या पेंट कंपन्यांपैकी एक बनली.
संशोधन आणि विकास संचालक म्हणून, दाणी यांनी संशोधनात मोठी गुंतवणूक केली, ज्यानं कंपनीच्या वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. आज एशियन पेंट्स ही भारतातील सर्वात मोठी पेंट कंपनी आहे. त्याच वेळी, ती आशियातील तिसरी सर्वात मोठी आणि जागतिक स्तरावर नववी सर्वात मोठी कंपनी आहे.
एशियन पेंट्सचे को-फाऊंडर अश्विन दाणी यांचं निधन, ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्रसिद्ध पेंट ब्रँड एशियन पेंट्सचे सह-संस्थापक अश्विन सूर्यकांत दाणी यांचं गुरुवारी वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झालं.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 03:54 PM2023-09-28T15:54:45+5:302023-09-28T15:55:05+5:30