वॉशिंग्टन : जगावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे सर्वच अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसला असून, सन २०२०-२१ मध्ये जगभरातील अर्थव्यवस्थांच्या जीडीपीच्या दुप्पट कर्जाचा बोजा वाढण्याची भीती आहे. त्याचप्रमाणे जीडीपी १४ टक्के घटून सर्वच देशांच्या अर्थसंकल्पीय तुटीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते, असा इशारा आंतरराष्टÑीय नाणेनिधीच्या एका अधिकाऱ्याने दिला आहे.नाणेनिधीच्या आर्थिक व्यवहार विभागाचे संचालक व्हिटर गास्पर यांनी हा इशारा देतानाच सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थांना महसुलातील तुटीचा प्रश्न भेडसावणार असल्याचे सांगितले. यामुळे सर्वच सरकारांना अधिक प्रमाणात कर्ज घ्यावे लागणार असून, अर्थसंकल्पातील तूट मोठ्या प्रमाणावर वाढण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मागील वर्षापेक्षा जागतिक पातळीवरील सार्वजनिक कर्ज सुमारे २० टक्क्यांनी वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. अमेरिका, जपान, युरोपियन देश यांच्यावरील कर्जाचा बोजा मोठ्या प्रमाणात वाढू शकेल, असे मत गास्पर यांनी व्यक्त केले.विकसनशील देशांना धोका अधिककाही उभरत्या अर्थव्यवस्थांची आर्थिक स्थिती खालावल्यामुळे त्यांना आपल्या कर्जाचे पुनर्गठन करताना अधिक व्याजदराने कर्ज घेण्याचा धोका संभवतो, असे गास्पर यांनी स्पष्ट केले. कमी उत्पन्न असलेल्या विकसनशील देशांना आधीच कर्जाच्या बोजाने व्यापले आहे. त्यातच कोरोनाच्या साथीमुळे त्यांना गरिबीलाही तोंड द्यावे लागत आहे. या देशांची स्थिती लक्षात घेऊन आंतरराष्टÑीय समूहाने या देशांसाठी काही विशेष योजना आखण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. चीनमधील परिस्थिती आता सुधारली असून, त्यांच्या अर्थव्यवस्थेने घेतलेला वेग हा चांगला असल्याचे मतही गास्पर यांनी नोंदवले.
जगातील कर्ज होईल जीडीपीच्या दुप्पट, नाणेनिधीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 6:53 AM