नवी दिल्ली : ५जी, कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स यांसारख्या सर्व उगवत्या क्षेत्रांतील आवश्यक तंत्रज्ञानाच्या किफायतशीर व विश्वासार्ह समाधानासाठी संपूर्ण जग भारताकडे अपेक्षेने पाहत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले.
‘इंडियन मोबाईल काँग्रेस’साठी (आयएमसी) पाठविलेल्या संदेशात मोदी यांनी हे वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की, ५जी तंत्रज्ञानापासून कृत्रिम बुद्धिमत्ता, व्हर्च्युअल रिॲलिटी, क्लाउड, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि रोबोटिक्सपर्यंत सर्व नव्या क्षेत्रांत आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाच्या सक्षम, किफायतशीर व विश्वासार्ह समाधानासाठी जग भारताकडे अपेक्षेने पाहत आहे. भविष्यात गतिमान तंत्रज्ञान प्रगतीच्या शक्यता आहेत. त्यात लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी आपण तंत्रज्ञानाचा कसा वापर करू शकतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, दूरसंचार क्षेत्राच्या नियामकीय चौकटीला आम्ही जगात सर्वश्रेष्ठ करू इच्छितो. त्यासाठी आम्ही सूचना मागविल्या आहेत.
आदित्य बिर्ला उद्योगसमूहाचे चेअरमन कुमारमंगलम बिर्ला यांनी सांगितले की, दूरसंचार क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने अनेक महत्त्वपूर्ण हस्तक्षेप केले आहेत. त्यातून हे क्षेत्र मजबूत होईल. तसेच तंत्रज्ञान क्षेत्रात भारत नेतृत्वस्थानी राहण्यास मदत होईल. भारती एयरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांनी सांगितले की, दूरसंचार क्षेत्रातील नव्या खटल्यांचे प्रमाण कमी करण्याची गरज आहे.
स्मार्टफोनवर सबसिडी द्या : अंबानी
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सांगितले की, डिजिटल क्रांतीला प्रोत्साहन देण्यासाठी निवडक समूहांच्या स्मार्टफोनवर सबसिडी देण्याची गरज असून, त्यासाठी युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन (यूएसओ) फंडाचा वापर करण्यात यावा.