Join us

इलॉन मस्क यांची खुर्ची धोक्यात; नवीन वर्षात दररोज गमावली 1 अब्ज डॉलर्सची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 20:27 IST

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट पहिल्या क्रमांकावर आले आहेत.

Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क (Elon Musk) यांची खुर्ची धोक्यात आली आहे. या वर्षी आतापर्यंत त्यांच्या एकूण संपत्तीत 30.5 अब्ज डॉलरची घट झाली आहे. म्हणजेच, मस्क यांनी दररोज 1 अब्ज डॉलरहून अधिक संपत्ती गमावली. गेल्या वर्षी मस्क जगातील सर्वाधिक कमाई करणारे व्यक्ती होते. कॅलेंडर वर्ष 2023 मध्ये त्यांच्या संपत्ती 92 अब्ज डॉलर्सची वाढ झाली होती. मात्र नवीन वर्ष त्यांच्यासाठी वाईट ठरत आहे. 

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, मस्क यांची एकूण संपत्ती आता 204.5अब्ज डॉलर्सवर आली असून, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. पहिल्या क्रमांकावर फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट आले असून, त्यांची संपत्ती 207.8 अब्ज डॉलर्स झाली आहे. विशेष म्हणजे, मस्क यांची कंपनी टेस्ला मार्केट कॅपच्या बाबतीत जगातील टॉप-10 कंपन्यांमधून बाहेर पडली आहे.

फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, बर्नार्ड अर्नॉल्ट आणि कुटुंब $207.6 बिलियनसह पहिल्या क्रमांकावर आहेत. इलॉन मस्क 204.7 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर घसरले आहेत. या यादीत बेझोस 181.3 अब्ज डॉलरसह तिसऱ्या स्थानावर आहेत. एलिसन ($142.2 अब्ज) चौथ्या, झुकेरबर्ग ($139.1 अब्ज) पाचव्या, बफे ($127.2 अब्ज) सहाव्या, लॅरी पेज ($127.1 अब्ज) सातव्या, गेट्स ($122.9 अब्ज) आठव्या, ब्रिन ($121.7अब्ज) नवव्या आणि बॉलमर ($118.8 अब्ज डॉलर) दहाव्या स्थानावर आहेत. या यादीत भारताचे मुकेश अंबानी 104.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 11व्या आणि गौतम अदानी 75.7 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 16व्या स्थानावर आहेत.

टॅग्स :एलन रीव्ह मस्कमुकेश अंबानीगौतम अदानीमार्क झुकेरबर्गबिल गेटसव्यवसाय