नवी दिल्ली - भारताचे केंद्रीय मंत्री पीयुष गोयल सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. गोयल यांनी याठिकाणी टेस्लाच्या प्लांटलाही भेट दिली. भारत सरकार टेस्लाला आयात शुल्कात सवलत देण्याच्या विचारात असताना पीयुष गोयल यांनी टेस्ला प्लांटला दिलेली भेट महत्त्वाची आहे. त्यात इलॉन मस्क यांनी केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांचीही माफी मागितली आहे. अखेर इलॉन मस्क यांना पीयुष गोयल यांची माफी मागण्याची गरज का पडली? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल याचं कारण जाणून घेऊ.
इलॉन मस्कनं माफी का मागितली?
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी भारताचे वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांची कॅलिफोर्नियातील फ्रेमोंट येथील कंपनीच्या कारखान्याच्या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत उपस्थित राहू न शकल्याने माफी मागितली आहे. इलॉन मस्क म्हणाले की, गोयल यांनी फ्रेमोंट प्लांटला भेट देणे हा “सन्मान” आहे. याशिवाय भविष्यात तुम्हाला भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे. मी आज कॅलिफोर्नियाला भेट देऊ शकलो नाही याबद्दल दिलगीर आहे, परंतु मी भविष्यात भेटण्यास उत्सुक आहे असं X वर गोयल यांच्या ट्विटला उत्तर देताना मस्क यांनी लिहिलं आहे.
It was an honor to have you visit Tesla!
— Elon Musk (@elonmusk) November 14, 2023
My apologies for not being able to travel to California today, but I look forward to meeting at a future date.
भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनी कॅलिफोर्नियातील फ्रेमोंट येथील अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाच्या उत्पादन युनिटला भेट दिली. कंपनी भारतातून तिच्या वाहन घटकांची आयात दुप्पट करेल. मी आज टेस्लाच्या फ्रेमोंट, कॅलिफोर्निया येथील अत्याधुनिक उत्पादन युनिटला भेट दिली. यावेळी प्रतिभावान भारतीय इंजिनिअर आणि वित्त विभागात वरिष्ठ पदांवर भारतीयांना काम करताना पाहून चांगले वाटले. तसेच, मोटार वाहनांच्या जगात बदल करण्यात टेस्लाचे योगदान पाहून खूप आनंद झाला अशी पोस्ट गोयल यांनी केलीय.
टेस्लाला करसवलत मिळू शकते
टेस्ला इलेक्ट्रिक वाहन पुरवठा साखळीतील भारतीय वाहन घटक पुरवठादारांचे वाढते योगदान पाहून मला अभिमान वाटतो. ते भारतातून त्यांच्या घटकांची आयात दुप्पट करणार आहेत. पीयूष गोयल यांची ही भेट अशा वेळी आली आहे जेव्हा भारत सरकार टेस्लाला भारतात सीमाशुल्क सवलत देण्याचा विचार करत आहे. मस्कने ऑगस्ट २०२१ मध्ये सांगितले होते की, जर टेस्ला देशात वाहने आयात करण्यात यशस्वी ठरली तर ती भारतात उत्पादन युनिट स्थापन करू शकते. टेस्ला आपले वाहन भारतात उत्पादन करू इच्छित आहे, परंतु भारतातील आयात शुल्क जगातील कोणत्याही मोठ्या देशाच्या तुलनेत सर्वाधिक आहे असं मस्क यांनी म्हटलं होते.
भारत आयात शुल्क किती लावतो?
भारत सध्या ४० हजार अमेरिकन डॉलरहून अधिक CIF (किंमत, विमा आणि मालवाहतूक) मूल्य असलेल्या पूर्णपणे आयात केलेल्या कारवर १०० टक्के आयात शुल्क लावतो. यापेक्षा कमी किमतीच्या कारवर ७० टक्के आयात शुल्क आकारले जाते. जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्ला इंकचे प्रमुख इलॉन मस्क यांनी जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली. या बैठकीनंतर मस्क यांनी २०२४ मध्ये भारतात येण्याचं प्लॅनिंग असल्याचे सांगितले होते.