न्यूयॉर्क : लग्झरी फॅशन ग्रुप ‘एलव्हीएमएच’चे प्रमुख आणि जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अरनॉल्ट हे निवृत्तीची जोरदार तयारी करत आहेत. व्यवसायाची जबाबदारी सांभाळण्यासाठी ते आपल्या मुलांना तयार करत आहेत. ते पद कधी सोडतील, याबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार, मुले छोटी होती तेव्हा अरनॉल्ट त्यांची गणिताची परीक्षा घेत असत. त्यांना व्यावसायिक दौऱ्यावर सोबत घेऊन जात असत. त्यांची ५ मुले आता ‘एलव्हीएमएच’मध्ये मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. त्यांची कन्या डेल्फिन या क्रिश्चियन डायरच्या सीईओ आहेत. पुत्र अँटनी याच कंपनीचे सीईओ आहेत. अलेक्झांडर हे टिफनी अँड कंपनीचे उपाध्यक्ष आहेत. फ्रेडरिक हे टग होयचे प्रमुख आहेत. जीन लुई हे विताँच्या घड्याळ डिव्हिजनचे मार्केटिंग-डेव्हलपमेंट डायरेक्टर आहेत. इतर अनेक श्रीमंतांची संपत्ती अधिक अस्थिर असताना अरनॉल्ट यांनी आपले अग्रस्थान कायम ठेवले आहे.
कोण आहेत अरनॉल्ट? अरनॉल्ट हे लग्झरी फॅशन इंडस्ट्रीचे गॉडफादर मानले जातात. सर्वांत मोठा फॅशन समूह ‘लुई विताँ मोएट हेनेसी’चे ते संस्थापक आहेत. समूहात ६० कंपन्या असून त्यांचे ७५ लक्झरी ब्रँड आहेत. २०८ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह (१७ लाख कोटी रुपये) ते सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत.
पाचही मुलांसोबत घेतात लंच भेटबर्नार्ड हे आपल्या पाचही मुलांना महिन्यातून एकदा ‘एलव्हीएमएच’च्या पॅरिसमधील मुख्यालयात ९० मिनिटांच्या लंचवर भेटतात. समूहात काय बदल करायला हवेत, यावर ते मुलांचा सल्ला घेतात. बर्नार्ड अरनॉल्ट हे आपल्या प्रायव्हेट जेटने प्रवास करणे पसंत करतात.