Join us

व-हाडातील धरणात अत्यल्प जलसाठ्याने चिंता

By admin | Published: February 12, 2015 12:12 AM

अत्यल्प जलसाठ्यामुळे पश्चिम वऱ्हाडातील सरासरी ९३ हजार हेक्टर क्षेत्रावरील फळबागा धोक्यात आल्या आहेत. मान्सूनने दगा

ब्रह्मानंद जाधव,मेहकर (जि. बुलडाणा)अत्यल्प जलसाठ्यामुळे पश्चिम वऱ्हाडातील सरासरी ९३ हजार हेक्टर क्षेत्रावरील फळबागा धोक्यात आल्या आहेत. मान्सूनने दगा दिल्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर झळ सोसावी लागली. त्यानंतर रबी हंगामालाही अत्यल्प पावसाचा फटका बसला आहे. अमरावती विभागातील अमरावती, बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातील ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी सरासरी ९३ हजार ३३ हेक्टर क्षेत्रावर फळबाग फुलविली आहे; परंतु विभागातील बहुतांश धरणांमध्ये सरासरी ४० टक्क्यांच्या आतच जलसाठा उरला आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा धरणात २८ टक्के जलसाठा असून, दगडपारवा धरणातील जलपातळी शून्यावर पोहोचली आहे. पातूर तालुक्यातील मोर्णा मध्यम प्रकल्पात ४० टक्के, मूर्तिजापूर तालुक्यातील उमा या मध्यम धरणात १७ टक्केच जलसाठा आहे. निर्गुणा व तेल्हारा तालुक्यातील वाण धरणातील पाणीपातळीही खालावत चालली आहे.बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील नळगंगा धरणात ४५ टक्के, खामगाव तालुक्यातील ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात ६० टक्के व इतर धरणांमधील पाणीपातळीही खालावली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ४५ टक्केच जलसाठा उरला आहे. यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यातील पूस प्रकल्प, महागाव तालुक्यातील लोअस पूस या मध्यम धरणातही जलसाठा खालावत चालला आहे, तर केळापूर परिसरातील सायखेडा मध्यम प्रकल्पाची पातळी ४७ टक्के व नेर तालुक्यातील गोकी मध्यम प्रकल्पाची पातळी ५० टक्क्यांवर पोहोचली आहे.घाटंजी तालुक्यातील वाघाडी मध्यम प्रकल्प, बोरगाव मध्यम धरणांसह अमरावती जिल्ह्यातील जलसाठाही खालावत चालला आहे.अमरावती विभागातील बहुतांश धरणातील जलसाठे ४० टक्क्यांच्या खाली आल्याने फळबागांवर पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे.