लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : वित्त वर्ष २०२२-२३ मध्ये विमा कंपन्यांच्या विरोधात तब्बल १.२७ लाख तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यातील २२ टक्के म्हणजेच २६,१०७ तक्रारी चुकीच्या पद्धतीने पॉलिसी विकण्यात आल्याच्या संदर्भात आहेत. या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.
भारतीय विमा नियामकीय आणि आणि विकास प्राधिकरणाने (इरडाई) जारी केलेल्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. विमा कंपन्यांविराेधातील एकूण तक्रारी घटल्या आहेत. अहवालानुसार, २०२१-२२ मध्ये १.५५ लाख तक्रारी विमा कंपन्यांच्या विरोधात दाखल झाल्या होत्या. याचाच अर्थ २०२२-२३ मध्ये तक्रारींची संख्या २८ हजारांनी घटली आहे.
सरकारी विमा कंपन्यांच्या विरोधात ८१,४९४, तर खाजगी कंपन्यांच्या विरोधात ४५,८८४ तक्रारी दाखल झाल्या आहेत. चुकीच्या पद्धतीने पॉलिसी विकल्याच्या तक्रारी सरकारी कंपन्यांच्या विरोधात २,९७८, तर खाजगी कंपन्यांच्या विरोधात २३,१२९ आल्या. जीवन विम्याप्रमाणेच आरोग्य विम्याच्या ६६ टक्के तक्रारींचा निपटारा करण्यात आला. चुकीच्या विक्रीप्रकरणी ७ लाख विमा एजंटांना नोकरीवरून काढण्यात आल्याचेही अहवालात म्हटले आहे.
एजंट किती?
२६.२८ लाख एजंट विमा उद्योगात एकूण आहेत. १३.४७ लाख सरकारी कंपन्यांचे तर खाजगी कंपन्यांचे १२.८० लाख एजंट आहेत. ८.८५ लाख नवीन एजंट मागील वर्षी भरती करण्यात आले. ५२.७६ टक्के नवीन एजंट मागील वर्षी भरती करण्यात आले.