वर्ल्ड रेसलिंग एन्टरटेन्मेंट म्हणजेच WWE कंपनीची विक्री झाली आहे. या अल्टीमेट फायटिंग चॅम्पियनशीपची पेरेंट कंपनी इंडीवर ग्रूपनं WWE कंपनी विकत घेतली आहे. आता WWE आणि UFC चं विलीनीकरण होणार आहे. ज्यानंतर एक नवी कंपनी अस्तित्वात येणार आहे. नव्या कंपनीत एंडेवरची ५१ टक्के भागीदारी असणार आहे. तर WWE शेअर होल्डर्सकडे कंपनीचे ४९ टक्के वाटा असणार आहे. या डीलमध्ये WWE चे एकूण मूल्य ९.३ बिलियन डॉलर आणि UFC चे मूल्य १२.१ बिलियन डॉलर इतके आहे. विलीनीकरणानंतर तयार होणाऱ्या नव्या कंपनीचं नाव नंतर जाहीर केलं जाणार आहे आणि कंपनीच्या बोर्डमध्ये ११ जणांचा समावेश असणार आहे. यातील सहा सदस्य एंडेवर आणि पाच सदस्य WWE द्वारे नियुक्त केले जाणार आहेत.
एंडेव्हरचे सीईओ एरी इमॅन्युएल हे एंडेव्हर आणि नवीन कंपनी या दोघांचे मुख्य कार्यकारी म्हणून काम करतील, विन्स मॅकमोहन कार्यकारी अध्यक्ष असतील. डाना व्हाईट हे UFC चे अध्यक्ष राहतील आणि WWE चे CEO निक खान हे कुस्ती व्यवसायाचे अध्यक्ष राहतील. विलीन केलेली कंपनी जगातील दोन सर्वात मोठ्या स्पोर्ट्स एंटरटेनमेंट ब्रँड्सना एकत्र आणेल. UFC मध्ये प्रामाणिक स्वरुपात मिक्स्ड मार्शल आर्ट मारामारीची वैशिष्ट्ये आहेत, तर WWE मध्ये स्क्रिप्टेड सामने आणि सोप ऑपेरा सारखी कथानकं असतात.
विलीनीकरणाची पुष्टी कॅलिफोर्नियातील WWE च्या मुख्य लाइव्ह इव्हेंट रेसलमेनियाच्या एका दिवसानंतर आली. कंपनी अनेक महिन्यांपासून खरेदीदाराच्या शोधात होती आणि या प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी मॅकमोहन जानेवारीमध्ये अध्यक्ष म्हणून परतले. या वर्षी WWE शेअर्समध्ये ३३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, त्यानंतर कंपनीचे बाजार मूल्य ६.७९ अब्ज डॉलरपेक्षा जास्त झाले आहे.
विलीनीकरणानंतर WWE सह कौटुंबिक व्यवसाय समाप्त होईल. या कंपनीची स्थापना मॅकमोहनच्या वडिलांनी २० व्या शतकाच्या मध्यात केली होती. गेल्या ४० वर्षांपासून WWE ने जागतिक स्तरावर आपलं नाव कमावलं आहे. कंपनीनं हल्क होगन, ड्वेन "द रॉक" जॉन्सन, रिक फ्लेअर, बॅटिस्टा आणि जॉन सीना यांसारखे सुपरस्टार दिले आहेत. WWE Endeavour सह विलीन केल्यानं शेअर होल्डर्सना अधिक बळ मिळेल. WWE ने मागील वर्षी १.२९ बिलियन डॉलरची कमाई केली.