- प्रसाद गो. जोशी
विविध सुट्ट्यांमुळे गतसप्ताहामध्ये शेअर बाजारात अवघे तीन दिवस व्यवहार झाले. या कालावधीत निर्देशांक खाली-वर झाला. बाजारातील वर्षअखेर तशी अनुत्साहात पार पडली असली, तरी सप्ताहाचा विचार करता निर्देशांकांमध्ये वाढ झाली. यामुळे गेल्या तीन सप्ताहांपासून बाजारात होत असलेल्या घसरणीला ब्रेक लागला, ही चांगली बाब आहे.
मुंबई शेअर बाजारात सप्ताहाचा प्रारंभ काहीसा निराशेनेच झाला. संवेदनशील निर्देशांक खाली खुला झाला. त्यानंतर, तो ३३३७१.०४ ते ३२५१५.१७ अंशांच्या दरम्यान वर-खाली हेलकावत होता. सप्ताहाच्या अखेरीस तो ३२९६८.६८ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेत, त्यामध्ये ३७२.१४ अंशांची वाढ झालेली दिसून आली. राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)सुद्धा या सप्ताहामध्ये वाढलेला दिसून आला. या निर्देशांकामध्ये ११५.६५ अंशांची वाढ होऊन तो १०११३.७० अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप हे बाजाराचे क्षेत्रीय निर्देशांकही अनुक्रमे २६८.४८ आणि १९३.१८ अंशांनी वाढून बंद झाले आहेत. अमेरिकन अर्थव्यवस्थेमधील वाढ ही अधिक वेगाने होत असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर, जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेल्या सकारात्मक वातावरणामुळे गुंतवणूकदारांनी नफा कमविण्याचे धोरण स्वीकारून विक्री केल्याने बाजार काहीसे खाली आले. खनिज तेलाच्या किमती वाढत असल्यामुळे, त्याबाबतची चिंता
शेअर बाजारामध्ये दिसून येत आहे. यामुळे सर्वत्र सावधानता बाळगली जात आहे.
आगामी सप्ताहामध्ये भारतीय रिझर्व्ह बॅँकेच्या धोरणविषयक समितीची बैठक होणार आहे. यामध्ये पतधोरणाचा आढावा घेतला जाणार आहे. या दोन महिन्यांसाठी तरी व्याजदर तसेच अन्य दर कायम राखले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे या बैठकीनंतरच बाजाराची आगामी काळातील दिशा कशी राहील, हे स्पष्ट होण्याची दाट शक्यता दिसत आहे. तोपर्यंत वाट बघण्याचे धोरण सर्वच स्वीकारतील.
वर्षभरामध्ये सेन्सेक्स, निफ्टीने दिली ११ टक्के वाढ
आर्थिक वर्ष २०१७-१८ हे शेअर बाजारासाठी फायदेशीर राहिले असले, तरी आधीच्या वर्षापेक्षा हा फायदा कमी झालेला दिसला. सेन्सेक्स, निफ्टी, मिडकॅप आणि स्मॉलकॅप या सर्वच निर्देशांकांनी या वर्षात चांगली वाढ दिली. औषध निर्माण आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना मात्र या वर्षामध्ये मोठा फटका बसल्याचे दिसून आले.
वर्षभरामध्ये संवेदनशील निर्देशांक ३३४८.१८ अंश म्हणजेच ११.३० टक्क्यांनी वाढला. त्या आधीच्या वर्षामध्ये त्यात १६ टक्क्यांनी वाढ झाली होती. निफ्टीने वर्षभरामध्ये ९३९.७५ अंश म्हणजेच १०.२५ टक्क्यांनी वाढ दिली. आधीच्या वर्षी तो १८ टक्के वाढला होता. मिडकॅप (१३.२४ टक्के) आणि स्मॉलकॅप (१७.७९ टक्के) अशाच प्रकाराने वाढले आहेत.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ग्राहकोपयोगी वस्तू आणि स्थावर मालमत्तेच्या क्षेत्रामध्ये अनुक्रमे ५१ आणि ४० टक्के अशी भरभक्कम वाढ बघावयास मिळाली. मात्र, औषध निर्माण आणि सार्वजनिक बॅँकांच्या निर्देशांकांना सर्वाधिक फटका बसलेला दिसून आला.
या आर्थिक वर्षामध्ये शेअर बाजारातील सर्व आस्थापनांचे बाजारमूल्य २०,७०४.७२ अब्ज रुपयांनी वाढून १४२२४९.९७ अब्ज रुपये एवढे झाले आहे. या वर्षामध्येच बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने २९ जानेवारी रोजी ३६४४३.९८ अंश अशी सार्वकालीन उच्चांकी नोंद केली आहे. या सर्वच बाबींमुळे गुंतवणूकदारांसाठी हे वर्ष चांगलेच लाभदायक ठरले आहे.
वर्षअखेर अनुत्साहात; मात्र घसरणीला लागला ब्रेक
विविध सुट्ट्यांमुळे गतसप्ताहामध्ये शेअर बाजारात अवघे तीन दिवस व्यवहार झाले. या कालावधीत निर्देशांक खाली-वर झाला. बाजारातील वर्षअखेर तशी अनुत्साहात पार पडली असली, तरी सप्ताहाचा विचार करता निर्देशांकांमध्ये वाढ झाली. यामुळे गेल्या तीन सप्ताहांपासून बाजारात होत असलेल्या घसरणीला ब्रेक लागला, ही चांगली बाब आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 04:18 AM2018-04-02T04:18:29+5:302018-04-02T04:18:29+5:30