गुवाहाटी : राज्यातील आणि देशातील फटाका व्यावसायिकांना यंदा लक्ष्मी प्रसन्न आहे. हो, त्यांची दिवाळीही नेहमीपेक्षा चांगलीच साजरी होत आहे. अर्थात, चार पैसे खिशातून खुळखुळू लागले असले, तरी याला कारणही तसे खास आहे. गुवाहाटीसह अनेक भागांत या वर्षी चिनी फटाक्यांवर बंदी असल्याने, स्थानिक फटाका व्यावसायिकांना याचा अप्रत्यक्ष लाभ झाला आहे. ‘मेड इन इंडिया’चे हे वारे यंदा जोरात वाहू लागले आहेत. आॅल गुवाहाटी ट्रेडर्स असोसिएशनने (एजीटीए) सांगितले की, शहराच्या अनेक भागांत जे फटाके विकले गेले आहेत, ते तामिळनाडूच्या शिवकाशी येथे तयार झालेले आहेत. स्थानिक फटाका व्यावसायिकांनी बनविलेले फटाकेही येथे चांगल्या प्रमाणात विकले गेले आहेत. चिनी फटाक्यांची जागा यंदा या स्थानिक फटाक्यांनी घेतली आहे. बारपेटा या शहरात तयार झालेल्या फटाक्यांनाही चांगली मागणी आहे. या ठिकाणी तयार झालेल्या फटाक्यांनी आपली गुणवत्ता कायम ठेवली आहे. बारपेटा आणि शिवकाशी येथील फटाक्यांच्या किमतीही तशा सारख्याच आहेत, पण फटाक्यांच्या काही प्रकारात मात्र, बारपेटा येथील फटाक्यांच्या किमती अधिक आहेत. उझान बाजार येथील एक फटाका विक्रेता सौरव दास यांनी सांगितले की, स्थानिक फटाका व्यावसायिकांनीही यंदा चांगल्या दर्जाचे फटाके बाजारात आणले आहेत. आॅल गुवाहाटी ट्रेडर्स असोसिएशनचे (एजीटीए) महासचिव प्रणतोश रॉय यांनी सांगितले की, गुवाहाटीतील नागरिकांना आम्ही आवाहन केले आहे की, त्यांनी स्थानिक व्यावसायिकांचेच फटाके खरेदी करावेत. जेणेकरून राज्यातील अर्थव्यवस्थेला या माध्यमातून हातभार लागू शकेल. राज्य सरकारनेही ‘मेक इन आसाम’चा नारा द्यायला हवा. फटाका व्यावसायिकात यामुळे चैतन्य येऊ शकेल. बारपेटा येथील या व्यावसायिकांना आर्थिक मदत देण्याचीही गरज आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, गुवाहाटीत प्रशासनाकडून चिनी फटाक्यांवर बंदी आणल्याने, या भागात अशा फटाक्यांची विक्री होणार नाही, याकडे बारीक लक्ष ठेवले जात आहे.सोशल मीडियातून बंदीची हाकसोशल मीडियातूनही अनेक दिवसांपासून चिनी फटाक्यांवर बंदी घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अलीकडच्या काळात चीनने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला असहकार्य करण्याची जी भूमिका घेतली आहे, त्याचा देशातून उमटलेला हा संताप आहे.भारतात फटाक्यांची बाजारपेठ सुमारे 4000 कोटींची आहे. तामिळनाडूतील शिवकाशी जिल्ह्यात फटाक्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते, तरीही व्यापारी सुमारे १५०० कोटींच्या फटाक्यांची तस्करी करतात.
यंदा भारतातील फटाका व्यावसायिकांची दिवाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2016 6:38 AM